सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा महत्वाकांक्षी उपक्रम
चित्रपट, नाटक, संगीत आदी कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांच्या आठवणी, अनुभव आणि त्यांच्या कलेच्या सादरीकरणाचे दस्तवेजीकरण करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालयाने हाती घेतला आहे. आत्तापर्यंत तीन मान्यवर कलाकारांचा जीवनप्रवास ध्वनिचित्रबद्ध करण्यात आला असून या उपक्रमास ‘आठवणी कथन’ असे नाव देण्यात आले आहे.
एखादा कलाकार वृद्ध झाल्यामुळे त्याने कला सादरीकरण किंवा जाहीर कार्यक्रमातून निवृत्ती घेतली असली तरी त्या कलेच्या क्षेत्रातील त्याची तपश्चर्या खूप मोठी असते. सगळ्यांसाठी विशेषत: नव्या पिढीसाठी त्यांचा अनुभव, आठवणी हे एक प्रकारचे संचित असते. हा अमूल्य ठेवा त्यांच्याच तोंडून ऐकून त्यांचे समृद्ध अनुभव विश्व ध्वनिचित्रबद्ध करण्याची सूचना सांस्कृितक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार हा ‘आठवणी कथन’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमात आत्तापर्यंत ज्येष्ठ आकाशवाणी निवेदक बाळ कुडतरकर, संगीतकार प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांच्या जीवनप्रवासाचे दस्तवेजीकरण करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यसंचालक अजय आंबेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
त्या कलाकाराच्या सोयीनुसार आणि अगदीच आवश्यकता भासली तर त्याच्या घरी जाऊन हे ध्वनिचित्रमुद्रण करण्यात येत आहे. संबंधित कलाकाराच्या निवडक स्नेही मंडळीच्या उपस्थितीत मुलाखत स्वरुपात त्यांचा जीवनप्रवास आम्ही ध्वनिचित्रमुद्रीत करत आहोत. हे सर्वच कलाकार ८० ते ८५ वयाच्या पुढचे असल्याने त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे हे काम केले जात आहे. यात त्या कलाकाराकडून काही सादरीकरणही आम्ही करुन घेत आहोत. हे ध्वनिचित्रमुद्रण किमान सहा ते आठ तासांचे असल्याचेही आंबेकर म्हणाले.
हे दस्तवेजीकरण सध्या तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संग्रहालयासाठी केले जात आहे. भविष्यात ते रसिकांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार होऊ शकतो, असेही आंबेकर यांनी सांगितले. दरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे ध्वनिचित्रमुद्रण नुकतेच पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे पार पडले. आपल्या नाटय़ आणि अभिनय प्रवासाबरोबरच सुखटणकर यांनी वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ या नाटकातील काही गाजलेली स्वगते, कुसुमाग्रज यांच्या कविता तसेच आठवणींचा खजिना उलगडला.

सांस्कृतिक कार्य संचालयाने हाती घेतलेला ‘आठवणी कथन’ हा उपक्रम स्तुत्य आहे. या निमित्ताने विस्मृतीत गेलेल्या पण एक काळ गाजविलेल्या वृद्ध कलावंतांच्या आठवणी आणि अनुभवाचे दस्तवेजीकरण होणार असल्याने त्याला खूप महत्व आहे.
– मोहनदास सुखटणकर, अभिनेते

Story img Loader