मुंबई: औषधांना प्रतिरोधी क्षयरोगाची (डीआर टीबी) बाधा झालेल्या रुग्णांमधील सुमारे ३० टक्के रुग्ण मानसिक आजारांचा सामना करीत आहेत. या रुग्णांना मानसिक आजारांचे उपचारही वेळेत सुरू केल्यास क्षयरोगाचे उपचार यशस्वीपणे पूर्ण करण्याचे प्रमाणही वाढते. डीआर टीबी रुग्णांच्या समुपदेशन, नियमित मानसिक आजारांच्या तपासण्या आणि वेळेत योग्य उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे एमएसएफ या क्षयरुग्णांसोबत काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून अधोरेखित केले आहे.
मुंबईमध्ये डीआर टीबी बाधित रुगणांच्या उपचारासाठी जागतिक डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स -एमएसएफ ही संस्था गोवंडीमध्ये दवाखाना चालवते. डॉक्टर, परिचारिका, छातीरोगतज्ज्ञ यांच्या चमूसह या दवाखान्यात रुग्णांचा पाठपुरावा करण्यासाठी मानसिक समुपदेशकांचा स्वतंत्र चमूही कार्यरत आहे. या दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या ३४१ क्षयबाधितांचा या अभ्यासात समावेश केला आहे. हे संशोधन फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘प्लॉस वन’ या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
औषध प्रतिरोधी क्षयाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची नियमित औषधेही काम करत नाहीत. त्यामुळे अतितीव्र प्रतिजैविकांचा वापर यांच्या उपचारामध्ये केला जातो. या औषधांचे दुष्परिणामही तीव्र असून यामुळे रुग्णांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. या रुग्णांना जवळपास १८ ते २० महिने उपचार घ्यावे लागतात.
रुग्णांमध्ये नैराश्य येणे, चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, आत्मघाती प्रवृत्ती ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. या रुग्णांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण कितपत आहे, याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने एमएसएफने हे संशोधन केले आहे. मुंबई
क्षयरोगाचे नव्याने निदान झालेल्या रुग्णांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण हे क्षयरोगाचे आधीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त असल्याचे आढळले आहे. डीआरटीबीचे नव्याने झालेले निदान आणि या आजाराशी निगडित अनेक सामाजिक, कौटुंबिक अडचणी, अनिश्चितता यामुळे नव्याने निदान झालेल्या रुग्णांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीआरटीबीचे निदान झालेल्या रुग्णांन तातडीने मानसिक समुपदेशन मिळणे आवश्यक आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे.
क्षयरोगाचे उपचार पूर्ण करण्यास मदत मानसिक आजारांची बाधा झाल्याचे निदान झालेल्या आणि उपचार केलेल्या रुग्णांमध्ये सुमारे ७५ टक्के रुग्णांना औषध प्रतिरोधी क्षयरोगाचे उपचार यशस्वीपणे पूर्ण केल्याचे आढळले आहे. योग्य उपचार आणि मानसिक आधाराने डीआरटीबी रुग्णदेखील यशस्वीरित्या रोगावर मात करू शकतात, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. चिन्मय लक्ष्मेश्वर यांनी सांगितले.
औषध प्रतिरोधी क्षयाची बाधा झालेल्या सुमारे तीन रुग्णांपैकी एका रुग्णाला मानसिक आजारांशी सामना करावा लागतो आणि यातील जवळपास निम्म्या रुग्णांना उपचारादरम्यानच याचा त्रास होतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासह सर्वसमावेशक उपचार केल्यास या रुग्णांमध्ये क्षयरोगावरील यशस्वी उपचारांचे प्रमाणही सुधारते असे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.