राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था करावरून (एलबीटी) चार आठवडय़ांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याने १५ आणि १६ जुलैला राज्यातील व्यापाऱ्यांचा पुन्हा एकदा बंद पाळण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे.
मे महिन्यात झालेल्या बैठकीत तोडग्यासाठी तात्काळ समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण सहा आठवडे उलटले तरी समितीच स्थापन करण्यात आलेली नाही. यावरून सरकार एलबीटीवरून गंभीर नाही, असे स्पष्ट होते. नुसती आश्वासने देऊन व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. याच्या निषेधार्थ १५ आणि १६ तारखेला राज्यव्यापी बंद पाळण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेचे नेते मोहन गुरनानी यांनी सांगितले.