राज्यातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)ने स्थानिक संस्था कर (एलबीटी)विरोधात शुक्रवारी मुंबई आणि नागपूर बंदची हाक देत मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार केला असला तरी याच व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी जकातीऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला होता, असे उघडकीस आले आहे.
अन्य महापालिकांबरोबरच मुंबई आणि नागपूरमध्ये येत्या १ ऑक्टोबरपासून स्थानिक संस्था कराच्या विरोधात फॅमने शुक्रवारी मुंबई आणि नागपूर बंदची हाक दिली असून, त्यात सर्व क्षेत्रांतील घाऊक आणि किरकोळ व्यापारी सहभागी होणार आहेत. तसेच आझाद मैदानात व्यापाऱ्यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण- डोंबिवली आदी भागांतील व्यापारी सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून ‘एलबीटी हटवा नाहीतर मते मिळणार नाहीत’ असा इशारा सरकारला देण्यात येणार आहे.