‘झी एन्टरटेन्मेन्ट’ आणि ‘सोनी पिक्चर्स’चे विलीनीकरण

मुंबई : मनोरंजन विश्वातील दोन मोठ्या वाहिन्यांचे समूह एकत्र येणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. ‘झी एन्टरटेन्मेन्ट एंटरप्राइझेस लिमिटेड’च्या (झील) संचालक मंडळाने ‘सोनी पिक्चर्स नेटवक्र्स इंडिया’ या समूहाबरोबर तत्त्वत: विलीनीकरणाच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

 या दोन समूहांमध्ये झालेला हा करार तब्बल दीड अब्ज डॉलरचा असून विलीनीकरणानंतर पुनीत गोएंका मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठी काम पाहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

 विलीनीकरणाच्या करारानुसार सोनी पिक्चर्सचे यात सर्वाधिक म्हणजे ५२.९३ टक्के  समभाग असल्याने या समूहाच्या संचालक मंडळावरील नियुक्तीचे अधिकारही सोनीकडे असणार आहेत. तर झी एन्टरटेन्मेन्टकडे ४७.०७ टक्के  समभाग असणार आहेत. डिस्ने-स्टार एकत्र आल्यानंतर अशाच प्रकारे भारतीय मनोरंजन कं पनीशी करार करत येथील बाजारपेठेत वर्चस्व वाढवण्याचा सोनी पिक्चर्स नेटवक्र्स इंडियाचा प्रयत्न सुरू होता. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रिलायन्सची मालकी असलेल्या वायकॉम समूहाबरोबरही विलीनीकरणाविषयी सोनी पिक्चर्सची बोलणी सुरू होती.

मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने गेल्या वर्षीच विलीनीकरणाचा हा प्रस्ताव रद्द के ला गेला होता. झील समूहाने याआधीच त्यांच्या खेळावर आधारित वाहिन्या सोनी पिक्चर्सच्या ‘टेन स्पोर्ट्स’ ब्रॅण्डला विकल्या होत्या.   

दरम्यान, या दोन्ही समूहांच्या ओटीटी कं पन्या एकत्रित काम करणार की नाही, याबाबतचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.

होणार काय?

‘झील’च्या संचालक मंडळाने बुधवारी जाहीर के लेल्या निर्णयामुळे या दोन्ही मोठ्या समूहांच्या अखत्यारीत असलेल्या हिंदी आणि प्रादेशिक मनोरंजन वाहिन्यांसह, चित्रपट निर्मिती, संगीत, डिजिटल आशय अशा विविध क्षेत्रांत त्यांचा एकत्रित वावर असणार आहे.

महत्त्व का?

हिंदीसह प्रादेशिक मनोरंजन वाहिन्यांमध्ये झील समूहाच्या वाहिन्यांचे वर्चस्व आहे, तर क्रीडा वाहिन्यांबरोबरच हिंदी मनोरंजन विश्वातील प्रस्थापित वाहिनी म्हणून सोनी पिक्चर्सकडे पाहिले जाते. सर्वसाधारण मनोरंजन वाहिन्यांबरोबरच इतर क्षेत्रातही मक्ते दारी निर्माण करण्याच्या उद्देशाने हे दोन मोठे समूह एकत्र आले आहेत.

दोघांचा फायदा…

विलीनीकरणाच्या या निर्णयामुळे झील समूहाकडे असलेला २ लाख ६० हजार तासांचा दूरचित्रवाहिनीसाठी बनवण्यात आलेला दृक्श्राव्य भाग (कण्टेण्ट) तसेच हिंदीतील सर्वाधिक चित्रपटांचे हक्क, विविध भाषेतील ४८०० चित्रपटांचे हक्क सोनी पिक्चर्सला उपलब्ध होणार आहेत. तर सोनी पिक्चर्सच्या १६७ देशांमध्ये असलेल्या नेटवर्कचा आणि ७० कोटी प्रेक्षकसंख्येचा फायदा झील समूहाला घेता  येणार आहे.