शनिवारपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ठाणे ते सिंधुदुर्गदरम्यानच्या पट्टयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड परिसरात सर्वत्र शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील जून-जुलैची सरासरीही पावसाने भरून काढण्यास सुरुवात केली. दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असून अरबी समुद्रात मान्सूनचा जोर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मुंबईत शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान मुंबईत गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात कुलाबा आणि सांताक्रूझ येथे ४३.७ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी  रात्री साडेआठपर्यंत अनुक्रमे ४८.३ मिमी व ८०.४ मिमी पाऊस पडला. मुरबाड, माथेरान, इगतपुरी आणि विक्रमगड येथे २७० मिमी पावसाची नोंद झाली. अंबरनाथ येथे २२० मिमी तर कल्याण येथे २१० मिमी पाऊस पडला.
भरतीचा धोका
मुंबईत १ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चार मीटरहून अधिक उंचीची भरती आहे. या काळात मुसळधार पाऊस पडल्यास शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे वाहतूकही विस्कळीत होऊ शकते.