मुंबई : आणिक आगार, वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो ११ मार्गिकेसाठी अंदाजे २३ हजार ४८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम कर्ज आणि दुय्यम कर्जातून उभारली जाणार आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) ५ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले आहे. जपानी अधिकृत विकास सहाय्य (ओडीए) कर्जरुपाने हे कर्ज देण्यात आले आहे.

वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचा विस्तार वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मेट्रो ११ मार्गिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार आणिक आगार, वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अशी १७.५१ किमीची ही भुयारी मार्गिका असणार असून यात १४ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.

१४ मेट्रो स्थानकांपैकी एक स्थानक उन्नत असणार असून उर्वरित १३ स्थानके भुयारी असणार आहेत. या मार्गिकेस राज्य सरकारने मान्यता दिली असून आता या प्रकल्पाच्या प्रस्तावास केंद्र सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २३ हजार ४८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, या मार्गिकेचा विस्तार आता वडाळ्यापासून वांद्रे टर्मिनसपर्यंत केला जाणार आहे. या विस्तारीकरणास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे.

सरकारच्या निर्णयानुसार वडाळा ते वांद्रे टर्मिनस असा ६.९ किमीने मेट्रो ११ मार्गिकेचा विस्तार होणार आहे. तर या विस्तारीत मार्गात ५ मेट्रो स्थानके असणार आहेत. मेट्रो ११ मार्गिकेतील गेट वे ऑफ इंडिया ते आणिक आगार, वडाळा टप्पा १ साठी २३ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाची रक्कम कर्ज आणि दुय्यम कर्जाद्वारे उभारण्यात येणार आहे. त्यानुसार एमएमआरसीने जायकाकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेत त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेनुसार सदर मार्गिकेसाठी आता ५ हजार ५०० कोटी रुपयांचे जपानी अधिकृत विकास सहाय्य (ओडीए) कर्ज म्हणून हे कर्ज देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव डाॅ. आलोक तिवारी आणि जेआयसीए इंडिया कार्यालयाचे मुख्य प्रतिनिधी टेकुची ताकुरो यांनी नवी दिल्लीत या कर्जाच्या करारावर नुकतीच स्वाक्षरी केली. जायकाकडून ५ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्याने मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.