मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांचे छत साडेतीन वर्षातच गंजले असून अखेर महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) गाड्यांच्या छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गाड्यांच्या छतावर गंजरोधक उपाययोजना करण्यात येत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेच्या संचलन, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी एमएमएमओसीएलवर आहे. सध्या एमएमएमओसीएलकडून मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांवर २४ मेट्रो गाड्या चालवण्यात येत आहेत. या गाड्या सेवेत दाखल होऊन साडेतीन वर्षे होत नाहीत तोच काही गाड्यांचे छत गंजले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी सोमवारी गाड्यांचे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकले होते.
गाड्यांचे छत गंजल्याचे एमएमएमओसीएलने ‘एक्स’वरून (ट्विटर) प्रतिसाद देताना मान्य केले. मुंबईतील हवामानामुळे छताला किरकोळ गंज चढल्याचा दावा एमएमएमओसीएलने केला. गाड्यांच्या छताच्या दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली असून गंजरोधक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही एमएमएमओसीएलने स्पष्ट केले. तसेच गाड्यांच्या छतांना वा गाड्यांना कुठेही गंज लागू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी सविस्तर अभ्यास करण्यात येणार असून त्यानंतर कंत्राटदाराच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे एमएमएमओसीएलने स्पष्ट केले.
