आराखडा बदलणार; कांजूरमार्ग डेपोबाबत तीन महिन्यांत निर्णय नाही
मुंबईतील परिवहन व्यवस्था आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाचा डेपो अखेर आरे कॉलनीतच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या डेपोसाठी कांजूरमार्ग येथे पर्यायी जागा सुचवण्यात आली होती. मात्र या जागेबाबत काहीच निर्णय झाला नसल्याने अखेर आता मुंबई मेट्रोरेल प्राधिकरण आरे कॉलनीतील जागेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहे. या डेपोचा मूळ आराखडा बदलण्यात आला असून घनदाट झाडी असलेला भाग वगळून उर्वरित २४ हेक्टर भागात डेपो उभारला जाणार आहे.
मेट्रो-३च्या डेपोमुळे आरे कॉलनीतील २२९८ झाडांवर कुऱ्हाड पडणार होती. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या डेपोला विरोध केला. त्याला राजकीय रंग मिळाल्याने हा प्रकल्प तब्बल दीड वर्षे चिघळला आहे. त्यातच या प्रकल्पाच्या डेपोसाठी कांजूरमार्ग येथे पर्यायी जागा सुचवण्यात आली होती. मात्र या जागेबाबत तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आरे कॉलनीतच डेपो उभारण्याबाबत सूचना करण्यात आली होती.
कांजूरमार्ग येथील जागा दलदलीची असून तेथे डेपोच्या उभारणीसाठी ती जागा भराव टाकून समपातळीवर आणावी लागेल. त्यासाठी दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. परिणामी प्रकल्प आणखी रखडेल. तसेच मेट्रो-३च्या मार्गापासून कांजूरमार्गपर्यंत येण्यासाठी वेगळा मार्ग उभारावा लागेल. जोगेश्वरी-कांजूरमार्ग या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी कांजूरमार्ग डेपोची जागा ठेवण्यात आली आहे. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाकडे नसल्याने कांजूरमार्ग डेपोपर्यंत पोहोचणे अडचणीचे होणार असल्याचे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आरे कॉलनीतच मेट्रो-३चा डेपो उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या सभेत मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. मूळ आराखडय़ातील २२९८ झाडांऐवजी आता फक्त १००० झाडे तोडण्याची गरज आहे. आता २४ हेक्टर परिसरातच हा डेपो उभा करण्याचा प्रस्ताव असल्याचे भिडे यांनी सांगितले.
दुमजली डेपोचाही पर्याय होते. मात्र जास्त खर्चामुळे मरोळ-मरोशी रस्ता बंद करावा लागेल. हे व्यवहार्य नसल्याने एकमजली डेपोचा पर्याय निवडला. भविष्यात कांजूरमार्ग येथील डेपो तयार झाल्यावर तेथेही मेट्रो-३च्या गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती केली जाईल, असे भिडे यांनी स्पष्ट केले.