मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडचे काम रखडल्याने खर्चात १० हजार २७० कोटींची वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, खर्च वाढण्यामागे कारशेड हेच एकमेव कारण नसून अनेक कारणे असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) स्पष्ट केले. प्रकल्पाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास बराच वेळ गेल्याने तसेच मुंबईत भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करणे तांत्रिकदृष्टय़ा  आव्हानात्मक असल्याने खर्च वाढल्याचेही स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो ३ च्या प्रकल्प खर्चातील वाढ २०१८ पासून सुरू झाली असून ती २०२१ पर्यंतची आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरांना मेट्रोने जोडण्यासाठी ३३.५ किमीची भुयारी मेट्रो मार्गिका हाती घेण्यात आली. मुळात २३ हजार १३६ कोटींचा हा प्रकल्प आता ३३ हजार ४०५ कोटींचा झाला आहे. मेट्रो ३ च्या अतिरिक्त खर्चाला मान्यता दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष प्रकल्प, कारशेडम्चे काम रखडल्याने खर्चात वाढ झाल्याचे सांगितले. मात्र खर्च वाढण्यामागे कारशेड हेच एकमेव कारण नसून याशिवाय इतर अनेक कारणे असल्याची माहिती गुरुवारी ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

मेट्रो ३ मार्गिकेचे नियोजन  २०११ मध्ये करण्यात आले. दिल्ली मेट्रो रेलच्या मेट्रो कामाच्या धर्तीवर १० टक्क्यांची वाढ करून मेट्रो ३ चा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला होता, असे भिडे यांनी सांगितले. 

केंद्राकडे नवा प्रस्ताव..

मेट्रो ३ च्या खर्चात १० हजार २७० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सुधारित ३३ हजार ४०५ कोटींच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र आता यासाठी केंद्राचीही मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर ‘जायका’कडून ६६०० कोटींचा निधी (कर्ज) घेण्यात येईल, असेही भिडे यांनी यावेळी सांगितले.

२१ हजार ५२० कोटींची कामे पूर्ण..

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा प्रस्तावित खर्च २३ हजार १३६ कोटी आहे. त्यापैकी आतापर्यंत एमएमआरसीला २१ हजार ८९० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. यातील २१ हजार ५२० कोटी रुपये खर्च आतापर्यंत करण्यात आल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro 3 expensive carshed technical reasons cost increase ysh
First published on: 12-08-2022 at 00:02 IST