scorecardresearch

मेट्रो-३ पुढील वर्षी सेवेत; आरे कारशेडचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्णत्वास

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्या आरे कारशेडचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्ण होईल. 

मेट्रो-३ पुढील वर्षी सेवेत; आरे कारशेडचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्णत्वास
( संग्रहित छायाचित्र )

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्या आरे कारशेडचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर या ३३.५ किलोमीटर मार्गिकेतील सीप्झ ते बीकेसी हा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होईल, असा विश्वास ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

 अश्विनी भिडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाच्या सद्य:स्थितीसह खर्चाबाबत माहिती दिली़  मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाला २०१६ मध्ये सुरूवात झाली. या भुयारी मेट्रो मार्गाचे काम करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे प्रकल्पास विलंब झाला आणि २०२१ चा मुहूर्त चुकला, असे भिडे यांनी सांगितल़े मेट्रो ३ मार्गिकेतील कारशेडचा वाद सुरू होता. मात्र, आता आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती उठविण्यात आल्याने ‘एमएमआरसी’ने वेगाने कामास सुरूवात केली आहे. आतापर्यंत कारशेडचे २९ टक्के काम झाले आहे. पहिल्या टप्प्यातील कारशेडचे काम एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती भिडे यांनी दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील काम जुलै २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे ‘एमएमआरसी’चे नियोजन आह़े  त्यानंतर मेट्रो ३ मार्गिकेचा पहिला टप्पा (सीप्झ ते बीकेसी) डिसेंबर २०२३ मध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या कामास जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये सुरूवात होईल, असेही भिडे यांनी सांगितले. सुरक्षा चाचणी पूर्ण करून डिसेंबर २०२३ पासून सीप्झ ते बीकेसी भुयारी मेट्रो मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचे ‘एमएमआरसी’चे नियोजन आहे. 

अतिरिक्त जागेची गरज नाही

आरेतील ३० हेक्टर जागेवर कारशेड प्रस्तावित आहे. मात्र, प्रत्यक्षात ‘एमएमआरसी’ने आरेतील ६१ हेक्टर जागा ताब्यात घेतली आहे. त्यातील २५ हेक्टर जागेवर सध्या कारशेडचे काम करण्यात येत असून, ५ हेक्टर जागा हरित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात येणार असल्याचे ‘एमएमआरसी’ने स्पष्ट केल़े

मेट्रो ३ च्या आराखडय़ानुसार मेट्रो ३ साठी २०१६ मध्ये ३५ गाडय़ा, २०२५ मध्ये ४७ गाडय़ा आणि २०३१ मध्ये ५५ गाडय़ांची गरज लागणार आहे. त्यानुसार सध्या काम सुरू असलेल्या कारशेडमध्ये २४० डबे राहू शकतात. पण, २०३१ नंतर ५५ गाडय़ा कारशेडमध्ये ठेवण्यासाठी सध्याचे कारशेड अपुरे पडणार आहे. त्यामुळे ‘एमएमआरसी’ला कारशेडसाठी आरेत आणखी जागा लागणार आहे, असे आरोप आरे विरोधातील याचिकाकर्त्यांनी केले होते. भिडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सध्याची कारशेड ४१ मेट्रो गाडय़ा ठेवण्यासाठी पुरेशी आहे. भविष्यात, त्यातही २०५० च्या आसपास गाडय़ांची संख्या वाढल्यास एक ते दीड हेक्टर जागा लागेल, असे स्पष्टीकरण भिडे यांनी दिले.

चाचणी ऑगस्टअखेरीस

मेट्रो ३ मार्गिकेतील पहिली गाडी मरोळ-मरोशीतील तात्पुरत्या कारशेडमध्ये गेल्या आठवडय़ात दाखल झाली आहे. या गाडीची यशस्वी जोडणी करण्यात आली आहे. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टअखेरीस मेट्रो गाडीची चाचणी करण्यात येणार असल्याचे भिडे यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या खर्चवाढीमागे कारशेडसह तांत्रिक कारणे

मुंबई : मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडचे काम रखडल्याने खर्चात १० हजार २७० कोटींची वाढ झाली आह़े  मात्र, खर्चवाढीमागे कारशेड हेच एकमेव कारण नसून, अनेक तांत्रिक कारणे असल्याचे अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केल़े  या प्रकल्पाच्या खर्चातील ही वाढ २०१८ ते २०२१ पर्यंतची आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Metro 3 in service next year aarey carshed work completed july 2023 ysh

ताज्या बातम्या