मुंबई – वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए)पूर्ण करण्यात आला. या मार्गिकेच्या कामाअंतर्गत भांडूप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रीक टन वजनाचे तीन भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले आहेत. या कामामुळे मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला आता वेग येणार आहे.
एमएमआआरडीएकडून ३३.३२ किमी लांबीच्या मेट्रो ४ आणि २.७ किमी लांबीच्या मेट्रो ४ अ (कासारवडवली-गायमुख) मार्गिकेचे काम सध्या सुरु आहे. टप्प्याटप्प्यात मार्गिकेचे काम सुरु असून गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा १०.५ किमीचा आणि १० मेट्रो स्थानकांचा समावेश असलेला पहिला टप्पा पुर्णत्वाकडे जात आहे. या मार्गिकेवर सध्या गाड्या आणि इतर यंत्रणांच्या चाचण्या सुरु आहेत.
लवकरच सुरक्षा प्रमाणपत्राच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही महिन्यातच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. तर आता या मार्गिकेच्या पुढील टप्प्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. त्यानुसार नुकताच मेट्रो ४ मार्गिकेच्या कामातील महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे.
भांडूप पश्चिम येथे ३२५ मेट्रिक टन वजनाचे तीन स्टील स्पॅन्स नुकतेच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले आहेत. अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असे हे काम आठ हेवीड्युटी क्रेन्सच्या आणि १२ मल्टी-अॅक्सल वाहनांच्या सहाय्याने पार पाडण्यात आले आहे. या कामासाठी चार रात्रींची आवश्यकता होती. मात्र एमएमआरडीएचे अधिकारी-अभियंते आणि कामगारांच्या पथकाने हे काम केवळ दोन रात्रीतच पूर्ण केले. या कामासाठी एमएमआरडीएला मुंबई महानगर पालिका, बेस्ट उपक्रम, भांडूप वाहतूक पोलीस आणि भांडूप पोलिसांची मदत मिळाली. तर स्थानिकांच्या योग्य सहकार्यामुळे हे काम दोन रात्रीत पूर्ण करता आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.
या कामासाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वाॅर्डन आणि २५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. योग्य नियोजनामुळे भव्य असे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरित्या स्थापित करण्याचे आव्हान या पथकामुळे पेलता आले.या कामाच्या अनुषंगाने आता मेट्रो ४ मार्गिकेतील कामाला गती मिळणार आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन पहिल्या टप्प्यानंतर पुढील टप्पे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे.

