मुंबई : वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली – गायमूख मेट्रो ४ अ मार्गिकेतील गायमूख – कॅडबरी जंक्शन दरम्यानचा १०.५ किमीचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरली आहे. एप्रिल महिना संपण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना या टप्प्याच्या संचालनाच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कोणतीही ठोस पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हा टप्पा केव्हा सेवेत दाखल होणार आणि ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार याबाबत अनिश्चितता आहे.

तारखांवर तारखा

ठाणे आणि मुंबईला मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने ३२.३२ किमीच्या मेट्रो ४ आणि २.८८ किमीच्या मेट्रो ४ अ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या मार्गिकांची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहेत. त्यानुसार गायमूख ते कॅडबरी जंक्शन असा १०.५ किमीचा आणि मेट्रो स्थानकांचा समावेश असलेला हा टप्पा डिसेंबर २०२५ मध्ये सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. त्यानुसार एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यावरील गाड्यांच्या चाचण्यांना सप्टेंबर २०२५ मध्ये सुरुवात केली. मात्र डिसेंबर २०२५ चा मुहूर्त चुकला आणि पुढे या टप्प्याच्या संचालनाची प्रतीक्षा लांबली. हा टप्पा केव्हा सेवेत दाखल होणार यासंबंधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

त्यावेळी राज्य सरकारकडून एप्रिल २०२६ मध्ये पहिला टप्पा सेवेत दाखल होईल, असे जाहीर करण्यात आले. दरम्यान, एमएमआरडीएनेही या टप्प्याच्या संचालनाच्या दृष्टीने रिसर्च डिझाईन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) संस्थेकडून तपासणी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार ही तपासणी होऊन पुढे सुरक्षा चाचणी पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून आतापर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करणे अपेक्षित होते. मात्र एप्रिल महिना संपण्यासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक असतानाही मेट्रो ४, मेट्रो ४ अ मार्गिकांवरील पहिला टप्पा वाहतूक सेवेत केव्हा दाखल होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत प्रचंड अनिश्चितता आहे.

म्हणून विलंब…

याविषयी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आरडीएसओ आणि मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या चाचण्या शिल्लक असल्याचे सांगितले. या तपासण्या आणि चाचण्या पूर्ण होऊन सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाईल. मात्र तपासण्या, चाचण्या केव्हा पूर्ण होणार आणि सुरक्षा प्रमाणपत्र केव्हा प्राप्त होणार याबाबत एमएमआरडीए कोणतेही भाष्य करू शकत नाही. त्या त्या यंत्रणांचा तो भाग आहे. त्यामुळे हा टप्पा केव्हा सेवेत दाखल होणार याबाबत आता काहीही सांगता येणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही स्थानकांची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने हा टप्पा रखडला आहे. तर मेट्रो ४ मार्गिकेतील मुलुंड अपघातानंतर मेट्रो ४, मेट्रो ४ अ मार्गिकांच्या कामावर परिणाम झाला आहे. काही दिवस सल्लागारच नसल्यानेही कामाचा वेग मंदावला. परिणामी पहिल्या टप्प्यालाही त्याचा फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले.