मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मेट्रो ५ मार्गिकेच्या विस्तारित टप्पा २ (धामणकर नाका ते दुर्गाडी), टप्पा ३ (दुर्गाडी ते कल्याण) आणि ५ अ (भोईरवाडी ते उल्हासनगर) मार्गिकेच्या संरेखनास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. २८ ऑगस्टला यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता मेट्रो ५ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच एमएमआरडीएकडून विस्तारित मार्गिकेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. तर या विस्तारित मार्गिकेमुळे ठाणे ते उल्हासनगर प्रवास सुकर, अतिजलद होणार आहे.

एमएमआरडीएकडून ठाणे-भिवंडी-कल्याण अशा २४.९ किमीच्या आणि ८ हजार ४०० कोटी रुपयांच्या मेट्रो ५ मार्गिकेचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले. त्यानुसार कापूरबावडी ते धामणकर नाका अशा पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून आतापर्यंत या टप्प्याचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांत या टप्प्याचे संचालन करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. मात्र दुसरीकडे टप्पा २ चे काम रखडले होते. भिवंडी ते कल्याण टप्पा २ मार्गिकेत मोठ्या प्रमाणात पुनर्वसन व पुनर्वसाहत संबंधी समस्या असल्यामुळे पूर्वीच्या मेट्रोमार्गात सुधारणा करून दुर्गाडी ते कल्याण या उन्नत मार्गिकेचे भूमिगत मार्गिकेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही कारणाने विस्तारित मेट्रो ५ मार्गिकेच्या संरेखनात राज्य सरकारच्या निर्देशानुसार एमएमआरडीएने पुन्हा सुधारणा केली. त्यानुसार मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार टप्पा २ अंतर्गत धामणकर नाका ते दुर्गाडीपर्यंत, टप्पा ३ अंतर्गत दुर्गाडी ते कल्याणपर्यंत आणि ५ अ अंतर्गत भोईरवाडी ते उल्हासनगरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. या नवीन संरेखनास काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर संरेखनाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी गेला होता.

केंद्र सरकारने टप्पा २, ३ आणि ५ अ मार्गिकेस नुकतीच मान्यता दिली असून यासंबंधीची अधिसूचना २८ ऑगस्टला प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता मेट्रो ५ मार्गिका ठाणे ते उल्हासनगर अशी धावणार आहे. टप्पा २, ३ आणि ५ अ मार्गिकेच्या बांधकामासाठी आता लवकर एमएमआरडीएकडून निविदा काढल्या जातील आणि विस्तारित मेट्रो मार्गिकेचे काम मार्गी लागेल. या विस्तारित मार्गिकेमुळे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमधील रहिवाशांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांचा प्रवास अतिजलद, सुकर होणार आहे. दरम्यान, धामणकर नाका ते दुर्गाडी टप्पा १०.४८ किमीचा असून यात ६ स्थानकांचा समावेश आहे. या टप्प्याच्या कामासाठी ७ हजार ३२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर टप्पा ३ दुर्गाडी ते कल्याण ११.८२ किमीचा असून यात सात स्थानकांचा समावेश आहे. या टप्प्याच्या कामासाठी ४ हजार ६३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर भोईरवाडी ते उल्हासनगर ५ अ टप्पा ५.२७ किमीचा असणार आहे.