लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावरुन दहिसर-गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील आकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंत जाणे प्रवाशांसाठी आजच्या घडीला अडचणी ठरते. पण आता मात्र आकुर्ली स्थानकापर्यंतचा त्यांचा प्रवास लवकरच सुकर आणि सुरक्षित होणार आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण-उत्तर भागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या पुलाच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून नुकत्याच निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ७ ही १६.५ किमीची मार्गिका असून यात १३ मेट्रो स्थानकाचा समावेश आहे. ही मार्गिका एप्रिल २०२२ मध्ये अंशत: तर जानेवारी २०२३ मध्ये पूर्णत: वाहतूक सेवेत दाखल झाली. या मार्गिकेवरुन आजच्या घडीला मोठ्या संख्येने प्रवाशी प्रवास करत आहेत. अशावेळी या मार्गिकेतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील स्थानकापर्यंत द्रतगती मार्गावरुन ये-जा करणे अत्यंत अवघड ठरत आहे.

आणखी वाचा-Mumbai Crime : मुलाचं विमानाचं तिकिट काढलं, नातेवाईकाला बँकेची माहिती दिली; पत्नीची हत्या करून पती…; गोरेगावात खळबळ!

पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा पुल, पादचारी पुल नसल्याने प्रवाशांना मोठा वळसा मारुन दक्षिण-उत्तर भागात यावे-जावे लागते. ही बाब लक्षात घेत एमएमआरडीएने पश्चिम द्रुतगती मार्गावरील स्थानकांना पादचारी पुलाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मार्गिकेवर १४ पादचारी पुल बांधण्यात येणार आहेत. २१० कोटी रुपये खर्च करत या पुलांची टप्प्याटप्यात उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसार आता आकुर्ली मेट्रो स्थानकाला जोडणार्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील पादचारी पुलाच्या बांधकामासाठी शुक्रवारी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे.

या निविदेनुसार पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण-उत्तर भागाला आकुर्ली मेट्रो स्थानकाशी पादचारी पुलाने जोडले जाणार आहे. जेणेकरुन पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण-उत्तर भागातून प्रवाशांना ये-जा करणे सुलभ होईल. या पादचारी पुलासाठी ४० कोटी ५९ लाख ४३ हजार ७०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलाच्या बांधकामासाठी १८ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. हा पुल वाहतुकीसाठी खुला झाल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.