मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान अपघातांची मालिका सुरूच आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे या मार्गिकेच्या कामादरम्यान सोमवारी पुन्हा अपघात झाला. मेडेतिया नगर मेट्रो स्थानकाच्या कामाच्या वेळेस उंचावरून ग्रेनाईट कोसळले. या ग्रेनाईटचे तुकडे सर्व परिसरात विखुरले व या परिसरातून जाणाऱ्या शालेय व्हॅनचे चाक यामुळे पंक्चर झाले. यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदारांविरोधात कडक कारवाई केली आहे. कंत्राटदार जे. कुमारला या प्रकरणी १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड आजवर घडलेल्या अपघातांतील एकाचवेळी ठोठावण्यात आलेला सर्वाधिक दंड आहे.

मेट्रो ९ मार्गिकेचे कंत्राट जे. कुमार कंपनीला देण्यात आले आहे. या मार्गिकेच्या कामादरम्यान कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे आतापर्यंत १२ हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. या अपघातांत सात जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक अपघात या मार्गिकेच्या कामादरम्यान झाले असून सप्टेंबर २०२५ मध्ये मिरारोड, नया नगर येथे या मार्गिकेच्या कामादरम्यान ३० किलो वजनाचा हायड्रॉलिक जॅक खाली पडला होता. तर नोव्हेंबर २०२५ मध्ये साईबाबा नगर येथे ६५ फुटांवरून पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तसेच याच मार्गिकेच्या कामादरम्यान एक क्रेन चालक गाडला गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. हे सर्व अपघात कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे झाले असून त्याच्याविरोधात केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळेच अपघातांची मालिका सुरूच आहे.

जे. कुमारकडून केवळ मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यानच नव्हे तर प्रकल्पाच्या कामादरम्यानही अपघात होत आहेत. मात्र केवळ दंडात्मक कारवाई होत असल्याने अपघातांना आळा बसत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी पुन्हा या मार्गिकेच्या कामादरम्यान अपघात झाला. मेडेतिया नगर मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान सकाळी ११.४० च्या सुमारास स्थानकातून राडारोडा (डेब्रीज) हटविण्याचे काम सुरू होते. त्यावेळेस ग्रेनाईट उंचावरून खाली कोसळले. हे ग्रेनाईट रस्तेरोधक लावलेल्या क्षेत्रात पडले, मात्र त्याचे तुकडे आसपासच्या परिसरात विखुरले. यावेळी येथून एक शालेय व्हॅन जात होती, मात्र या व्हॅनला कोणतेही नुकसान झाले नाही. व्हॅनमध्ये विद्यार्थीही नव्हते. व्हॅनचे टायर पंक्चर झाले असून जर ग्रेनाईट थेट व्हॅन वा कोणत्याही इतर वाहनांवर कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

दंड २२ कोटींवर

दुर्घटनांप्रकरणी आतापर्यंत या कंत्राटदाराला १२ कोटींहून अधिकचा दंड ठोठावण्यात आला असून एकूण दंडाची संख्या २२ कोटी रुपयांच्या वर गेली आहे. दंड करूनही कंत्राटदाराची हलगर्जी सुरू असल्याने कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी कंत्राटदारासह उपकंत्राटदार गजनान कंपनीस १ कोटी ५० लाख रुपयांचा तर सिस्त्रा या सल्लागार कंपनीस एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.