मुंबई : कफ परेड – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर महिन्यात या मार्गिकेवरून ३८ लाख ६३ हजार ७४१ प्रवाशांनी प्रवास केला. या मार्गिकेवरून प्रतिदिन सरासरी १ लाख ४१ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.
मुंबईतील पहिली भुयारी आणि सर्वात लांब भुयारी मेट्रो मार्गिका आरे – कफ परेड दरम्यान पूर्ण क्षमतेने धावत आहे. ३३.५ किमी लांबीच्या या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला तेव्हा या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या केवळ १९ हजार होती. दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला तेव्हा ही संख्या ७० हजारांच्या घरात गेली. मात्र अपेक्षित प्रवासी संख्या मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) गाठता आली नाही. या मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक – कफ परेड असा शेवटचा टप्पा ९ ऑक्टोबरपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे.
आरे – कफ परेड या मार्गिकेवरील अपेक्षित प्रवासी संख्या प्रतिदिन १३ लाख अशी आहे. मात्र आजघडीला दैनंदिन प्रवासी संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. असे असले तरी आता या मार्गिकेला हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून भविष्यात मुंबईकर मोठ्या संख्येने या मार्गिकेचा वापर करतील, असा विश्वास एमएमआरसीला आहे. ही मार्गिका इतर मेट्रो मार्गिकांशी जोडली गेल्यानंतर प्रवासी संख्या आणखी वाढेल, असे एमएमआरसीचे म्हणणे आहे.
एमएमआरसीकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात या मार्गिकेवरून ३८ लाख ६३ हजार ७४१ प्रवाशांनी प्रवास केला आहे. शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्यापासून ९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान या मार्गिकेवरून ३३ लाख ३३ हजार ६८४ प्रवाशांनी प्रवास केला. सोमवार – शुक्रवारदरम्यान या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ४१ हजार ०२४ अशी आहे. तर ऑक्टोबरमध्ये एका दिवसातील विक्रमी दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ८२ हजार ४६१ अशी होती.
