मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी खासगी संवर्गातील वाहनांसाठी ‘एमएच ०१ एफके’ ही नोंदणी मालिका संपुष्टात येत असून, त्याऐवजी ‘एमएच ०१ एफएल’ ही नवीन नियमित मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करून घेण्यासाठी वाहनधारकांनी सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील सुधारित नियम ५४ (अ) नुसार विहित शुल्क भरून आकर्षक अथवा पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयाच्या विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक शुल्काचा धनादेश प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांच्या नावे सादर करावा लागतो.

आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता १८० दिवसांची असून, या कालावधीत संबंधित वाहनाची नोंदणी करणे आवश्यक आहे. आरक्षित क्रमांकाची पावती वाहनाच्या माहिती नोंदणीवेळी ‘वाहन-०४’ प्रणालीमध्ये नोंदविल्यानंतर संबंधित वाहनाला तो क्रमांक मंजूर केला जातो.

आवश्यक कागदपतरे

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जाचे नमुने कार्यालयातील खिडकी क्रमांक इ – ११ येथे उपलब्ध असून, मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एमएच ०१ एफएल’ या नवीन मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी अर्ज आणि विहित शुल्क १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ पर्यंत खिडकी क्रमांक इ – ११ येथे ऑल्विन पॉल यांच्याकडे सादर करता येईल.

एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने नोंदणी

एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्याच दिवशी दुपारी २ वाजता लिलाव पद्धतीने संबंधित नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) अनिल पाटील यांनी सांगितले.