नियमांचे उल्लंघन केल्याचा मध्य प्रदेश मित्र चॅरिटेबल ट्रस्टवर ठपका

मुंबई : गोरेगाव, मोतीलाल नगर -१ येथील ६००० चौ. मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाचा भाडेकरार रद्द करण्यात येणार आहे. गृहनिर्माण विभागाने म्हाडाच्या मुंबई मंडळाला यासंबंधीचे आदेश दिले आहेत. हा भूखंड मध्य प्रदेश मित्र चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आला होता. या ट्रस्टने कराराच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवून भाडेकरार रद्द करण्यात येणार असून या प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार आता लवकरच मुंबई मंडळाकडून ट्रस्टवर कारणे दाखवा नोटीस बजावून करार रद्द करण्याची प्रक्रिय सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळाने ४ डिसेंबर २००२ मध्ये मोतीलाल नगर -१ मधील ६००० चौ मीटरचा भूखंड मध्य प्रदेश चॅरिटेबल ट्रस्टला भाडेतत्त्वावर दिला होता. शाळेसाठी राखीव असलेला हा भूखंड २१ डिसेंबर २००४ मध्ये एका शिक्षण संस्थेला हस्तांतरित करण्यात आला. यासाठी तत्कालीन मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आले. पुढे या भूखंड संबंधित शिक्षण संस्थेने ३१ जुलै २००७ मध्ये रुस्तमजी केरावाला फाउंडेशन ट्रस्टला हस्तांतरित केला. अशाप्रकारे भूखंडाचे हस्तांतरण करता येत नाही. असे असतानाही एका भूखंडाचे तीन वेळा हस्तांतरण करण्यात आले. हा कराराचा भंग असून यासाठी देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र चुकीचे असल्याचे स्पष्ट करीत सरकारने २०१९ मध्ये या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार म्हाडाकडून या प्रकरणाची आर्थिक चौकशी होणे आवश्यक होते. मात्र, म्हाडाकडून ही कारवाई न झाल्याने याची दखल घेत शासनस्तरावर चौकशी करण्यात आली. या प्रकरणी मोठा गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ट्रस्ट आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश ८ मार्चला एका पत्राद्वारे सरकारने मुंबई मंडळाला दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्वरित भाडेकरार रद्द करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. या आदेशानुसार मंडळाने कोणती कारवाई केली याबाबत मंडळातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी लवकरच या ट्रस्टला भाडेकरार रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. नियमानुसार नोटीस बजाविणे गरजेचे असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करुन भाडेकरार रद्द करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मात्र त्याच वेळी ट्रस्ट आणि दोषी अधिकाऱ्याविरोधात कारवाई होणार का? कधी होणार? यावर बोलणे टाळले.

शाळेची मान्यता रद्द करा

मध्य प्रदेश मित्र चॅरिटेबल ट्रस्टला वितरित करण्यात आलेल्या या भूखंडावर विबज्योर हायस्कूल नावाने शाळा उभारण्यात आली आहे. या शाळेने आपल्याकडे भूखंड उपलब्ध असल्याची चुकीची माहिती दिली. त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्याचेही आदेश दिले आहेत.