मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथे परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध झाली आहे. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने छत्रपती संभाजीनगर आणि साताऱ्यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ९७ घरांसह म्हाडा गृहनिर्माण योजनेतील दोन घरे, अशा एकूण ९९ घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे लातूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील एकूण १०५ निवासी भूखंडांची सोडतीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही प्रक्रियांसाठी नुकतीच नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांना २८ सप्टेंबरपर्यंत भूखंडांसाठी तसेच घरांसाठी अर्ज करता येणार आहे. निवासी भूखंड खरेदी करून विजेत्यांना त्यावर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. घरे, भूखंड कुठे

छत्रपती संभाजीनगर मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सातारा, ईटखेडा, शहानुरवाडी, नक्षत्रवाडी येथील ९७ घरे सोडतीसाठी उपलब्ध झाली आहेत. तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी एन-७, सिडको, अत्यल्प उत्पन्न गटासाठी मुकुंदवाडी येथील प्रत्येकी एक सदनिका विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. मूर्तीजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील ७३ भूखंड व निलंगा (जि. लातूर) येथील ३२ निवासी भूखंडांचीही विक्री सोडतीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. सोडतीमध्ये २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सातारा, ईटखेडा, शहानुरवाडी, नक्षत्रवाडी येथील घरांचा समावेश आहे.

अर्ज कसा, कुठे करावा २८ सप्टेंबरदरम्यान नोंदणी, अर्जविक्री प्रक्रिया सुरू असेल. तर प्राप्त अर्जांची छाननी करून ५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत यावर दावे, हरकती नोंदविता येणार असून, १२ ऑक्टोबरला पात्र अर्जांची अंतिम यादी दुपारी १२ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, सोडत केव्हा काढली जाणार याची तारीख अद्याप मंडळाने निश्चित केलेली नसून, तारखेची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोडतीच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी https://housing.mhada.gov.in/ किंवा https://mhada.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी. तसेच मंडळाच्या सोडत मदत केंद्राशी ०२२-६९४६८१०० या क्रमांकावर तसेच मंडळाच्या ०२४०-२३३४०३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे करण्यात आले आहे.