‘म्हाडा’ वसाहतींच्या पुनर्विकासात अल्प उत्पन्न गटातील घरासाठी ४८४ चौरस फुटांचे घर देण्याची तरतूद बदलून त्याऐवजी ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याच्या विरोधात वांद्रे पूर्व येथील गांधीनगर वसाहतीमधील रहिवाशांनी कोणत्याही पक्षाला मतदान न करता ‘वरीलपैकी कोणीही नाही’ अर्थात ‘नोटा’चे अस्त्र उगारण्याचा इशारा दिला आहे. ‘उमेदवारांनो मतांसाठी हात जोडू नका’ असा फलकच त्यांनी लावला आहे.
गांधीनगरमध्ये मध्यम उत्पन्न गटाची आणि अल्प उत्पन्न गटाच्या वसाहती आहेत. मध्यम उत्पन्न गटाच्या वसाहतीला अधिमूल्य आकारून पुनर्विकासाची परवानगी तीन-चार वर्षांपूर्वीच मिळाली. आता तेथील रहिवाशांना चांगली मोठी घरे मिळणार आहेत. मात्र, अल्प उत्पन्न गटातील वसाहतीचा पुनर्विकास ‘म्हाडा’च्या सततच्या बदलत्या धोरणांमुळे रखडला. तशात सरकारने अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी पुनर्विकासात ४८४ चौरस फुटांच्या घराऐवजी अवघ्या ३०० चौरस फुटांची घरे मिळतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांमध्ये नाराजी पसरली होती.
हीच नाराजी आता समोर आली. राजकीय पक्षांनी वाऱ्यावर सोडल्याचा राग म्हणून कोणत्याही पक्षाला मत न देता ‘नोटा’चा पर्याय निवडण्याचे लोकांनी ठरवले आहे, असे या वसाहतीमधील समाधान गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष निलिमा वैद्य यांनी सांगितले. गांधीनगरमधील ३५ इमारतीमधील ११०० घरांमध्ये सुमारे साडे पाच हजार मतदार आहेत. हे सर्व ‘नोटा’चा पर्याय निवडून आपली नाराजी व्यक्त करतील, असे त्या म्हणाल्या.