scorecardresearch

वांद्रय़ातील बांधकामाशी परब यांचा संबंध नाही; शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घेरावानंतर ‘म्हाडा’चा निर्वाळा

सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीमुळे म्हाडाने अ‍ॅड. परब आणि गृहरचना संस्थांना नोटीस बजावली होती.

anil-parab
परब यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांची म्हाडा कार्यालयावर धड

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा वसाहतील अनधिकृत कार्यालयाचे बांधकाम पूर्णपणे पाडले आहे का, याची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या जाहीर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या परब यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांसह म्हाडा कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक मारली. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीमुळे म्हाडाने अ‍ॅड. परब आणि गृहरचना संस्थांना नोटीस बजावली होती. अ‍ॅड. परब यांनी म्हाडा मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी सुमारे तीन तास चर्चा केल्यावर या अनधिकृत बांधकामाशी परब यांचा कोणताही संबंध नसल्याचा निर्वाळा म्हाडाने दिला.

संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन दुपारपासून सुरू असल्याने परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी सोमय्या यांना म्हाडा वसाहतीत जाण्यापासून रोखले. सोमय्या यांना पोलिसांनी येऊ द्यावे आणि शिवसेना कार्यकर्ते चांगलाच पाहुणचार करतील, असा इशारा परब यांनी पत्रकार परिषदेत दिला. या जागेशी माझा काहीच संबंध नसून म्हाडाने शहानिशा न करता मला पाठविलेली नोटीस मागे घेतली आहे. सोमय्या यांनी लावलेली आग त्यांनाच भस्मसात करील, असे अ‍ॅड. परब यांनी स्पष्ट केले.

म्हाडा वसाहतीतील गांधीनगरमधील कैलासनगर सोसायटी ( इमारत क्र.५७) व रविकिरण सोसायटी ( इमारत क्र. ५८) दरम्यानच्या मोकळय़ा जागेतील परब यांचे अनधिकृत कार्यालय पाडून टाकावे, अशी मागणी सोमय्या यांनी लोकायुक्त, राज्य सरकार म्हाडा व संबंधित यंत्रणांकडे अनेकदा केली होती. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर म्हाडाने संबंधित गृहरचना संस्था आणि अ‍ॅड. परब यांना नोटिसा बजावून कार्यालय पाडण्याची सूचना केली होती. हे कार्यालय नियमित करण्याबाबत गृहरचना संस्थेमार्फत करण्यात आलेला अर्ज म्हाडाने फेटाळला होता. त्यामुळे अनधिकृत बांधकाम पाडले जाईल, असे या संस्थांनी ९ जानेवारी रोजी म्हाडाला कळविले होते. त्यानुसार त्यांनीच हे बांधकाम पाडले आहे. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी १७ जानेवारीला पाहणी केल्यावर पूर्ण बांधकाम पाडले गेले नसल्याचे आढळले, त्यामुळे त्यांना पुन्हा २३ जानेवारीला नोटीस बजावण्यात आली असून पुढे कोणतीही कारवाई केली नसल्याचे म्हाडाने अ‍ॅड. परब यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले. अनधिकृत कार्यालय पाडण्याबाबत परब यांना म्हाडाने २७ जून २०१९ रोजी नोटीस बजावली होती व ती २७ नोव्हेंबर २०२० रोजी मागे घेण्यात आली असल्याचे म्हाडाने नमूद केले. सोमय्या म्हाडा वसाहतीत जाणार असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे व म्हाडा कार्यालय परिसरात तैनात केला होता.

“…तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही”, म्हणत अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान

सोमय्यांना नाक घासायला लावणार

सोमय्या यांनी आरोप केलेले कार्यालय माझे नसून हे बांधकाम गृहरचना संस्थेचे आहे. म्हाडाने दिलेले लेखी पुरावे सोमय्या यांना नाक घासायला लावतील. ज्या अधिकाऱ्याने शहानिशा न करता मला नोटीस दिली, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. सोमय्या हे बदनामी करीत असल्याने त्यांच्याविरोधात दावा दाखल केला असल्याचे परब यांनी सांगितले.

“वांद्रेतील इमारत पाडली, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार?”, किरीट सोमय्यांचं अनिल परबांवर टीकास्त्र; म्हणाले, “मातोश्रीचे…”

पाडकाम सुरू असतानाही चुकीची माहिती

मुंबई मंडळाने ९ जानेवारी रोजी सोसायटीवर नोटीस बजावत स्वत:हून बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. अन्यथा म्हाडाकडून कारवाई करण्यात येईल असेही या नोटिशीत नमूद केले होते. या नोटिशीनुसार सोसायटीने तात्काळ पाडकामास सुरुवात केली होती, असे परब यांनी सांगितले. हे काम सुरू असतानाही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी १७ जानेवारी रोजी एक अहवाल दिला. या अहवालानुसार बांधकाम पूर्णपणे काढण्यात आले नसल्याची खोटी माहिती देण्यात आली.  एकूणच पाडकाम सुरू असतानाही खोटी माहिती देऊन नोटीस बजावणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची मागणी परब यांनी यावेळी केली.

“माफियागिरी पकडल्यावर तो मी नव्हेच म्हटलं….” अनिल परब यांना किरीट सोमय्यांचा टोला

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

परब यांनी म्हाडाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मुंबई मंडळाने या कार्यालयाच्या बांधकामाशी अनिल परब यांचा कोणताही संबंध नसल्याचे लेखी पत्र त्यांना दिले. सोमय्या खोटे बोलत असून हे पत्र त्याचा लेखी पुरावा आहे. सोमय्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी परब यांनी दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 04:24 IST