मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाची महागडी, एक कोटींपेक्षा अधिक किंमतीची घरे सोडतीत विकली जात नसल्याने अशी घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विकण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार सध्या या घरांची विक्री सुरू आहे. मात्र प्रथम प्राधान्यअंतर्गतही महागडी, एक कोटींवरील किंमतीची घरे विकली जात नसल्याने मुंबई मंडळाची चिंता वाढली आहे.

तर दुसरीकडे प्रथम प्राधान्य योजनेस सुरुवात करून दोन आठवडे उलटून गेले तरी अजूनही ५४ घरे विक्रीवाचून पडून आहेत. आतापर्यंत केवळ ६४ घरांचीच विक्री झाली आहे.

मुंबई मंडळाच्या घरांना इच्छुकांचा, विजेत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. मात्र मागील काही वर्षांपासून म्हाडाच्या सोडतीतील घरांच्या किंमती गगनाला भिडत आहेत. उत्पन्न मर्यादा आणि घरांची विक्री किंमत यात मोठी तफावत असल्याने त्या त्या उत्पन्न गटातील इच्छुकांना, विजेत्यांना घरे परवडत नसल्याने महागडी घरे विक्रीवाचून पडून राहत आहेत.

२०२३ मध्ये मुंबई मंडळाच्या सोडतीत ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील सात घरांचा समावेश होता. या घरांच्या किंमती थेट साडेसात कोटींवर गेल्या होत्या. या किंमतीत ही घरे विकली न गेल्याने घरांच्या किंमती काहीशा कमी केल्या, मात्र त्यानंतरही घरांची विक्री झाली नाही.

ताडदेवसह जूहू, तुंगा, पवई आणि अन्य काही ठिकाणची कोटींच्या घरांत किंमती असलेली घरेही विकली गेली नाहीत. ही घरे विकली न गेल्याने मंडळाचा महसूल अडकला आहे. त्यामुळे शेवटी मंडळाने पहिल्यांदाच मुंबईतील घरांचा समावेश प्रथम प्राधान्य योजनेत करून या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सोडतीतील अनेक अटी शिथिल करून ४ मार्चपासून ११८ घरांच्या विक्रीस सुरुवात केली. उत्पन्न मर्यादेपासून राज्यात कुठेही घर नसावे यासह अनेक अटी शिथिल असल्याने, मागेल त्याला घर मिळणार असल्याने ही घरे अवघ्या काही दिवसांत विकली जातील अशी आशा मंडळाला होती. मात्र ही आशा खोटी ठरली आहे.

प्रथम प्राधान्यअंतर्गत घरांची विक्री सुरू झाल्यानंतर वडाळ्यातील ४२ लाख रुपये किंमतीच्या २७ घरांसह एक कोटीच्या आतील इतर ठिकाणच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वडाळ्यातील २७ घरे पहिल्याच दिवशी अवघ्या काही मिनिटांत विकली गेली आहेत. ११८ पैकी आतापर्यंत केवळ ६४ घरांची विक्री झाली आहे. एक कोटींवरील घरांना अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ताडदेवमधील आठ कोटींच्या तीन घरांपैकी केवळ एका घरासाठी अर्ज दाखल झाला आहे. या घरासाठी १० टक्के रक्कम अर्जदाराने भरली आहे. मात्र १०० टक्के रक्कम भरली जात नाही तोपर्यंत हे घर विकले गेल्याचे शिक्कामोर्तब होणार नाही. दरम्यान ताडदेवमधील घरांसह भायखळा, जूहू, पवईतील दीड ते सहा कोटी रुपये किंमतींची घरे विकली जात नसल्याचे चित्र आहे. आजही ५४ घरांच्या विक्रीचे आव्हान मंडळासमोर असून ही घरे विकली जात नसल्याने मंडळाची चिंता वाढली आहे.