मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने संक्रमण शिबिराच्या गाळ्यांची संख्या वाढविण्यासाठी खासगी विकासकांच्या प्रकल्पातील गाळे भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाळे भाड्याने घेण्यासाठी मंडळाने काही महिन्यांपूर्वी निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाला आहे. एकाही खासगी विकासकाने म्हाडाला भाड्याने घरे देण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे दुरुस्ती मंडळाची चिंता वाढली आहे. मात्र त्याचवेळी गाळे उपलब्ध न झाल्यास रहिवाशांना घरभाड्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा मुद्दा उपस्थित करीत मंडळाने घरभाडे देण्यास प्राधान्य देण्याची तयारी केली आहे.

दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांची दुरुस्ती मंडळाकडून संक्रमण शिबिरातील गाळ्यामध्ये पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येते. तर एखादी इमारत कोसळल्यास त्यातील रहिवाशांनाही संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये स्थलांतरित केले जाते. अशा प्रकारे आतापर्यंत हजारो रहिवाशांना मंडळाने स्थलांतरित केले आहे. तर आता दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची संख्या वाढत असून आजघडीला ९५ इमारती अतिधोकादायक यादीत समाविष्ट आहेत. तर पावसाळ्याच्या आधीच्या सर्वेक्षणाअंतर्गत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्ती मंडळाला आता मोठ्या संख्येने संक्रमण शिबिरातील गाळ्यांची गरज भासणार आहे.

मंडळाकडे आजघडीला केवळ ४०० – ५०० गाळे शिल्लक आहेत. हे गाळे पुरेसे नसल्याने मंडळाने अखेर खासगी विकासकांकडून भाड्याने गाळे घेण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी यासाठी निविदा प्रसिद्ध केली. विकासकांना निश्चित असे भाडे देऊन त्यांची घरे भाड्याने घेऊन त्यांचा वापर संक्रमण शिबिरातील गाळे म्हणून करण्याची ही संकल्पना आहे. मात्र मंडळाच्या या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रतिसादच न मिळाल्याने संक्रमण शिबिराच्या गाळ्यांच्या टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून मंडळाची चिंताही वाढली आहे.

दुरुस्ती मंडळाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने मंडळाची चिंता वाढली आहे. मात्र दुसरीकडे मंडळाने यावर उपाय म्हणून अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना घरभाड्याचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही रहिवाशांना घरभाडे देण्यात आले असून घरभाड्यासाठी आणखी काही रहिवाशांचे अर्ज दाखल झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना प्रति महिना २० हजार रुपये घरभाडे देण्यात येते.

संक्रमण शिबिराचे पुरेसे गाळे नसल्याने आता मंडळाला घरभाडे द्यावे लागत असून भाड्याने घरांची शोधाशोध करावी लागत आहे. त्यामुळे मंडळावरील आर्थिक भार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने संक्रमण शिबिरातील घुसखोरांना बाहेर काढावे, पुनर्विकासाचे काम झाल्यानंतरही संक्रमण शिबिराचे गाळे हस्तांतरित न करणाऱ्या विकासकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. मंडळाने नुकतीच धारावीत घुसखोरांविरोधात कारवाई सुरू केली. तेव्हा सर्व संक्रमण शिबिरात अशी कारवाई होते का आणि म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या गाळ्यांच्या संख्येत भर पडते का, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.