मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने वर्सोव्यातील आराम नगर अभिन्यासात आता १० मजली वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी मंडळाकडून या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, निविदेत स्पेक्ट्रम कंपनीने बाजी मारली. त्यामुळे आता या निविदेस अंतिम मान्यता घेऊन वृद्धाश्रमाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
काम सुरू झाल्यापासून साडेतीन वर्षांत वृद्धाश्रमाचे बांधकाम पूर्ण करून तो कार्यान्वित करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. हा वृद्धाश्रम म्हाडाचा मुंबईतील पहिला वृद्धाश्रम आहे.राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देण्याची जबाबदारी असलेल्या मंडळाने आता सामाजिक दायित्व म्हणून गृहनिर्मितीसह इतरही प्रकल्प हाती घेण्यास सुरुवात केली आहे.
राज्याच्या गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गृहप्रकल्प निर्मितीला चालना देण्यासाठी अनेक तरतुदीही करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, केंद्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास ‘ग्रोथ हब’ म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रोथ हबची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) आहे. या ग्रोथ हबअंतर्गत आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट म्हाडाला देण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या निवाऱ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने एमएमआरमध्ये वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील पहिला वृद्धाश्रम वर्सोव्यातील आराम नगरमध्ये बांधण्यात येणार आहे.
आराम नगर म्हाडा अभिन्यासातील अंदाजे २,३०६ चौरस मीटर जागेवर अडीच चटई क्षेत्र निर्देशांकानुसार वृद्धाश्रम बांधण्यात येणार आहे. १० मजली वृद्धाश्रमाच्या इमारतीचा आराखडा वास्तूरचनाकार शशी प्रभू यांनी तयार केला आहे. या आराखड्यात काही बदल सुचविण्यात आले असून, त्यानुसार सुधारित आराखडा तयार केला जात आहे. दरम्यान, या वृद्धाश्रमाच्या कामासाठी मंडळाने काही महिन्यांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. आर्थिक निविदा गुरुवारी खुल्या करण्यात आल्या असून, यात स्पेक्ट्रम कंपनीने बाजी मारल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आता या निविदेस अंतिम मान्यता घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करून कामास सुरुवात करण्यात येईल. काम सुरू झाल्यापासून साडेतीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वृद्धाश्रमात कार्यालय, डे-केअर, सभागृह, उपाहारगृह, बँक, दवाखाना, मनोरंजन केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत पहिले वृद्धाश्रम उभारण्यात येणार असून, ते कार्यान्वित झाल्यास गरजू ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांना मोठा दिलासा मिळणार आहे.
