मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीला अद्यापही पुरेसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण २२ मे ते १० जून या कालावधीत अनामत रक्कमेसह केवळ १७ हजार अर्ज दाखल झाले आहेत. मुंबईत पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) म्हाडाकडून घरांची विक्री केली जात असताना या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या योजनेखाली अत्यल्प गटाला सर्वाधिक १९४७ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, या घरांसाठी आतापर्यंत (१० जून) अनामत रक्कमेसह केवळ ३१३१ अर्ज दाखल झाले आहेत. त्याचवेळी म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १७९५ घरांना मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या घरांसाठी १२ हजार ८९२ अर्ज दाखल झाले आहेत.

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी चार वर्षांनंतर सोडत काढण्यात येणार आहे. त्यातही अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक ३८२४ घरांचा या सोडतीत समावेश आहे. मात्र अजूनही सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन सोडत प्रक्रियेनुसार आता सोडतीपूर्वीच कागदपत्रे जमा करून घेत ऑनलाईन पात्रता निश्चिती केली जाते. त्यामुळे सोडतीत केवळ पात्र आणि गरजू इच्छुकच अर्ज दाखल करतात. अनामत रक्कमेसह दाखल होणारे अर्ज तुलनेने कमी आहेत. मात्र, त्याचवेळी म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती, किंमती आणि उत्पन्न यातील तफावतीमुळे गृहकर्ज उपलब्ध न होणे यांमुळे अर्जाची संख्या कमी झाल्याचे दिसते आहे.

सोडतीत गोरेगाव पहाडीतील सर्वाधिक २६८३ घरांचा समावेश असून या घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळेल असा अंदाज सुरुवातीपासून व्यक्त होत होता. मात्र या २६८३ घरांपैकी अत्यल्प गटातील १९४७ घरे पीएमएवायमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. मुंबईत मोठय़ा संख्येने पती-पत्नी कमावते असल्याने अनेक इच्छुक तीन लाखांच्या उत्पन्न मर्यादेत बसत नाहीत. भारतात कुठेही घर नसावे या अटीचीही पूर्तता होताना दिसत नाही. उत्पन्न मर्यादेची अट पूर्ण करणाऱ्यांसाठी साठीही घरे महाग ठरत असून पुढे गृहकर्ज मिळणे शक्य होणार नसल्याने या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत पीएमएवायमधील १९४७ घरांसाठी केवळ ३१३१ जणांनी अनामत रक्कम भरून अर्ज निश्चित केले आहेत.

‘लोकसत्ता’ला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ४०८२ घरांसाठी ३२ हजार २५२ अर्ज भरले गेले आहेत. मात्र, त्यातील केवळ १७ हजार १४५ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. सर्वाधिक म्हणजे २४ हजार ५२५ अर्ज हे म्हाडा गृहनिर्माण योजनेतील (एमबी-०२) १७९५ घरांसाठी आले आहेत. २४ हजार ५२५ पैकी १२ हजार ८९२ अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाले आहेत.

अँटॉप हिल, कन्नमवार नगर, पहाडी (अल्प), उन्नत नगर, मागाठाणे येथील ही घरे आहेत. मंडळाला खासगी विकासकांकडून मिळालेल्या १३९ घरांसाठी १४९८ अर्ज आले असून यातील केवळ ५६४ अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाले आहेत. ही घरे अंधेरी, जुहू, गोरेगाव, घाटकोपर, विक्रोळी येथील आहेत. मुंबई मंडळाला दादरमध्ये मिळालेल्या चालू बांधकाम प्रकल्पातील महागडय़ा ७५ घरांनाही कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी ३६० अर्ज आले असून अनामत रक्कमेसह त्यातील केवळ १०५ अर्ज दाखल झाले आहेत.