उत्पन्न गटांची अर्थ मर्यादा वाढवण्याबाबत लवकरच निर्णय
‘म्हाडा’ची घरे आपल्या खिशाच्या आवाक्यात आहेत, असे वाटणाऱ्या नागरिकांना आता या घरांसाठी ज्यादा पैसे खर्च करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने उत्पन्न गटांच्या पूर्वीच्या मर्यादेत बदल करून त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. याला गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी देखील दुजोरा दिला असून याबाबतचा शासन निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचे समजते आहे. त्यामुळे म्हाडाची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहेत.
मुंबईत महागडय़ा घरांसाठी स्वस्त घरांचा पर्याय म्हणून अनेक जण ‘म्हाडा’तर्फे काढण्यात येणाऱ्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले असतात. ही स्वस्त घरे मिळवण्यासाठी हजारो नागरिक प्रत्यके लॉटरीच्या वेळी देव पाण्यात घालून बसतात. मात्र, आता या घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कारण, शासन ही घरे विकत घेणाऱ्या नागरिकांच्या उत्पन्न गटांच्या मर्यादेत बदल करणार असून पूर्वीच्या उत्पन्न मर्यादेत आता वाढ होणार असल्याचे समजते आहे. याला राज्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर यांनी देखील दुजोरा दिला असून याबद्दलचा शासन निर्णय येत्या काही दिवसांत शासनातर्फे काढण्यात येणार आहे. त्यानंतर काढण्यात येणाऱ्या घरांच्या लॉटऱ्यांसाठी हा निर्णय लागू असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काही काळात निघणाऱ्या घरांच्या लॉटऱ्यांमध्ये उत्साह दाखवणाऱ्या नागरिकांच्या खिशाला चाट बसण्याची शक्यता असून घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी नागरिकांना अधिक बचत करावी लागणार आहे.

मर्यादेत वाढ का?
केंद्राच्या ‘पंतप्रधान आवास योजने’तील घरांसाठी ठरवून देण्यात आलेल्या उत्पन्न गटांच्या मर्यादेत बदल करण्यात आल्याने त्या अनुषंगाने राज्यात देखील बदल करणे आवश्यक आहे. म्हणून, राज्य सरकार या मर्यादेत बदल करणार असल्याचे गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. मात्र, हे बदल यापूर्वी काढण्यात आलेल्या घरांच्या लॉटऱ्यांसाठी लागू नसून शासन निर्णय झाल्यानंतरच्या घरांच्या लॉटऱ्यांसाठी मात्र हे बदल लागू होतील असेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.