मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण मंडळ त्याच्या तयारीला लागले असून घरांची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे. नव्या वर्षात २००० हून अधिक घरांसाठी सोडत काढण्याचे मंडळाचे नियोजन असून आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या सोडतीची अधिकृत घोषणा आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारीच्या अखेरीस वा मार्चच्या सुरुवातीला सोडत काढण्यात येण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र त्याचवेळी मंडळाच्या गृहनिर्माण योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांकडे मात्र इच्छुक पाठ फिरवतात. प्रकल्पाचे ठिकाण, घराची किंमत आणि इतर कारणांमुळे या घरांना प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, या घरांचा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समावेश करून त्यांची मंडळाला विक्री करावी लागते. मात्र २० टक्के योजनेतील घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले असते.
२०२५ च्या सोडतीतही २० टक्के योजनेतील घरांनाच चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२५ मध्ये सोडतीत घर न लागलेल्या आणि आता ठाण्यासह आसपासच्या परिसरात म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाने नव्या वर्षात सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून घरांची शोधाशोध सुरू आहे. सोडतीत २००० पेक्षा अधिक घरे समाविष्ट करण्याचे नियोज आहे. यात २० टक्क्यांसह इतर योजनेतील घरांचाही समावेश असेल, असेही सूत्रांनी सांगितले.
मंडळाच्या २०२५ च्या सोडतीतील १३०० हून अधिक घरे विजेत्यांनी परत केली असून यात म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या सर्वाधिक आहे. परत करण्यात आलेल्या घरांसाठी आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाणार आहे. यानंतर शिल्लक राहणाऱ्या घरांसह नवीन उपलब्ध होणाऱ्या घरांचा समावेश करून सोडत काढली जाईल. या सोडतीची घोषणा आचारसंहितेनंतर केली जाणार आहे. तर त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या सोडतीत पुन्हा खंड
म्हाडाच्या मुंबई मंडळाने २००७ ते २०१९ दरम्यान नियमित सोडत काढली होती. २०२० ते २०२२ दरम्यान मात्र सोडतीत खंड पडला. घरे उपलब्ध नसल्याने, तसेच करोनाचा काळ असल्याने सोडतीत खंड पडला. त्यानंतर मात्र २०२३ आणि २०२४ मध्ये मंडळाने सोडत काढली. मुंबई मंडळाने २०२४ च्या सोडतीच्या वेळी २०२५ मध्ये सोडत काढण्याची घोषणा केली होती असे जाहीर केले होते.
मार्च-एप्रिल २०२५ म्हणत म्हणत दिवाळीपर्यंत सोडतीचा मुहूर्त गेला. पण सोडतीला काही मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे २०२५ मध्ये सोडतीत पुन्हा खंड पडला. आता २०२६ मध्ये सोडत काढली जाते का याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मार्च २०२६ मध्ये मुंबईतील घरांसाठी सोडत काढली जाईल, असे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र सोडतीच्यादृष्टीने मुंबई मंडळाकडून अद्यापही कोणतीही तयारी सुरू झालेली नाही. त्यामुळे मार्चमध्ये सोडत निघते का पाहणे महत्त्वाचे ठरेल.
प्रथम प्राधन्य घरविक्रीही लांबणीवर
मागील दोनपेक्षा अधिक सोडतीतील विक्रीवाचून रिक्त घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या योजनेद्वारे १२५ घरांची दिवाळीत विक्री करण्याचे मंडळाने जाहीर केले, मात्र यासाठीचे काम पूर्ण न झाल्याने दिवाळीचा मुहूर्त डिसेंबरवर गेला. तर डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू झाल्याने आता ही घरविक्री लांबणीवर पडली आहे.
आचारसंहितेनंतर प्रथम प्राधान्य योजनेतील घरांची विक्री सुरू होईल असे मंडळाकडून सांगितले जात आहे. घरांच्या किंमती निश्चित करण्यात आल्या असून किंमती अंतिम करण्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्य अधिकाऱ्यांकडे गेला आहे. किंमती निश्चित करून आचारसंहितेनंतर निश्चितपणे या घरविक्रीस सुरुवात होईल, असा दावा मंडळातील अधिकाऱ्यांनी केला.
