मुंबई : शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येणाऱ्या तरुण-तरुणींसाठी, विद्यार्थ्यांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काळाचौकी, जिजामाता नगर येथे १८ मजली वसतिगृह बांधण्यात येत आहे. या वसतिगृहाचे काम २०२२ मध्ये सुरू झाले असून आतापर्यंत वसतिगृहाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पास विलंब झाला आहे. प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून दिवाळीपर्यंत प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करून वसतिगृह सेवेत दाखल केले जाणार आहे. हे वसतिगृह सुरू झाल्यास मुंबईत शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने येणाऱ्या तरुण-तरुणींच्या निवाऱ्याची व्यवस्था होईल.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचे काम म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांमार्फत केले जाते. त्यानुसार आतापर्यंत मुंबईसह राज्यभर म्हाडाने लाखो घरे बांधली आणि सोडतीद्वारे त्यांचे वितरण करून लाखो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. तसेच सामाजिक दायित्व म्हणून म्हाडाने सहा-सात वर्षांपूर्वी मुंबईत वसतिगृह बांधून विद्यार्थ्यांना आणि महिलांनाही तात्पुरता निवारा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिला प्रकल्प काळाचौकीतील जिजामाता नगर येथे राबविण्याचे निश्चित करून त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली.
जिजामाता नगर येथील १५०० चौरस मीटर जागेवर वसतिगृहाची १८ मजली इमारत बांधण्याच्या कामास २०२२ मध्ये सुरुवात करण्यात आली. शिक्षणासाठी आणि नोकरी-धंद्यासाठी राज्याच्या, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या तरुण-तरुणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई मंडळाने जिजामाता नगरमधील वसतिगृह तरुण-तरुणींसाठी निश्चित केले.
जिजामाता नगरमधील १८ मजली वसतिगृह आतापर्यंत बांधून सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पास विलंब झाला असून आजही प्रकल्पाचे काम सुरूच आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणी यंत्रसामग्री वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी योग्य रस्ता नसल्याने, तसेच रस्त्यावरून वाहतूक करण्यास स्थानिकांकडून विरोध होत असल्याने वसतिगृहाच्या बांधकामास विलंब होत असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रकल्पास मोठा विलंब झाला असून आता हा प्रकल्प वेगाने पूर्ण करून दिवाळीपर्यंत वसतिगृह खुले करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१८ मजली वसतिगृहाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित अंतर्गत कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करून तात्काळ वसतिगृह खुले केले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे वसतिगृह खुले झाल्यास मुंबईतील ते म्हाडाचे पहिले वसतिगृह ठरणार असून या वसतिगृहाद्वारे अंदाजे ५०० तरुण-तरुणींची राहण्याची सोय होणार आहे. त्यामुळे मुंबईत शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या वसतिगृहाचे व्यवस्थापन खासगी संस्था किंवा कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यानुसार लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया राबवून संस्थेची किंवा कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.
१८ मजली इमारतीच्या तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंत व्यावसायिक गाळे आहेत. वसतिगृहातील तरुण-तरुणींना बँकेसह आवश्यक त्या सर्व सुविधा तिथेच उपलब्ध व्हाव्यात यासाठी या गाळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हे गाळेही निविदा पद्धतीने भाड्याने दिले जाणार आहेत. सहाव्या ते अठराव्या मजल्यापर्यंत ३७५ खोल्या असून येथे ५०० विद्यार्थ्यांची निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
