मुंबई : गेल्या दोन दशकांपासून भूखंड ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिलासा दिला. तसेच, कांदिवली (पश्चिम) येथील मोकळा भूखंड याचिकाकर्त्याला हस्तांतरित करण्याचे आदेश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) दिले. मालमत्तेचा ताबा देण्यापासून अशाप्रकारे वंचित ठेवणे म्हणजे ”न्यायाची थट्टा” असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने हा आदेश देताना नोंदवले.
म्हाडासारखे प्राधिकरण नागरिकांना अशा प्रकारे मनमानी पद्धतीने त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही, असे ताशेरेही न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने ओढले. तसेच, आदेशाची प्रत उपलब्ध झाल्याच्या दिवसापासून चार आठवड्यांच्या आत भूखंडाचा ताबा याचिकाकर्त्याकडे सोपवण्याचे स्पष्ट केले. म्हाडाच्या वकिलांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची केलेली मागणीही न्यायालयाने फेटाळली.
राजेश बचाव यांनी ही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेनुसार, म्हाडाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन मोकळ्या विकसित भूखंडांच्या वाटपासाठी अर्ज मागवले होते. याचिकाकर्त्याने अर्ज केल्यानंतर त्यांना कांदिवली (पश्चिम) स्थित चारकोप येथील आरएससी-११ परिसरातील सुमारे ७६.७५ चौरस मीटरचा भूखंड क्र. १०० मंजूर करण्यात आला होता. याचिकाकर्त्याने आवश्यक प्रीमियम आणि भाडे भरल्यानंतर, म्हाडाने २७ ऑक्टोबर २००५ रोजी ९० वर्षांच्या कालावधीसाठी एक नोंदणीकृत भाडेकरार केला होता. त्यानंतरही, म्हाडाने त्यांना या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा दिला नाही. त्यामुळे, याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणीच्या वेळी म्हाडाने बचाव यांच्या याचिकेला विरोध केला. तसेच, हा भूखंड ”सागरी किनारा नियमन क्षेत्रांतर्गत” (सीआरझेड) येतो आणि न्यायालयीन निर्बंधांमुळे तो कोणालाही देता येणार नाही, असा दावा केला. याशिवाय, मूळ अर्जदाराने हा भूखंड तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केला असल्याचा अस्पष्ट दावाही म्हाडातर्फे करण्यात आला. न्यायालयाने मात्र २००५ च्या भाडेकराराची वैधता कायम ठेवली व म्हाडाचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. तसेच, २००५ मध्ये केलेला भाडेकरार अजूनही वैध आणि कायदेशीर आहे. कोणत्याही सक्षम न्यायालयाने हा करार रद्द केलेला नाही किंवा तो अवैध ठरवलेला नाही, असे नमूद करून याचिकाकर्त्याला मालमत्तेचा ताबा देणार नसल्याचा म्हाटाला युक्तिवाद फेटाळला,
म्हाडाचा तृतीय-पक्ष हस्तांतरणाबाबतचा दावा देखील न्यायालयाने फेटाळला आणि हस्तांतरण चांगल्या हेतुने करण्यात आले नव्हते याला पृष्टी देणारी कागदपत्रे नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्याचप्रमाणे याचिकेवरील सुनावणी ही केवळ अंमलात आलेल्या भाडेकरारांतर्गत याचिकाकर्त्याच्या जमिनीवरील हक्काबाबत आहे. सध्याच्या सीआरझेड नियमांनुसार तिथे बांधकाम करणे परवानगीयोग्य आहे की नाही, हा मुद्दा त्यांच्या विचाराधीन नाही, असेही न्यायालयाने आदेशात प्रामुख्याने स्पष्ट केले.
