मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अंदाजे ८ हजार घरांची सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. घरांची शोधाशोध सुरू असून लवकरच घरांची संख्या निश्चित करून ऑगस्टअखेरीस अंदाजे ८ हजार घरांसाठी सोडत काढण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे. ऑगस्टअखेरीस नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करून सप्टेंबरअखेरीस वा ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये ५३५४ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. तर एप्रिल २०२६ मध्ये पुन्हा सोडत काढली जाईल, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, एप्रिलमध्ये सोडतीची घोषणा झाली नाही आणि इच्छुकांची प्रतीक्षा लांबत गेली. पण आता मात्र कोकण मंडळाने सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंडळ तयारीला लागले आहे.
ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई क्षेत्रातील २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत विकासकांकडून घरे उपलब्ध करून घेण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील २० टक्के योजनेतील अंदाजे १० हजार घरे मंडळाला उपलब्ध झाली नसल्याची माहिती नुकतीच मंडळाच्या एका अभ्यासातून समोर आली आहे. विकासकांनी ही घरे लाटल्याचा आरोप होत असून विकासक आणि संबंधित महानगरपालिकांकडून २० टक्के योजनेतील घरे मंडळाला देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही यावरून स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने आता मंडळाने सर्व महानगरपालिकांकडे घरे देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार महिन्याभरात मोठ्या संख्येने २० टक्के योजनेतील घरे मंडळाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही घरे उपलब्ध झाल्यास सोडत काढली जाणार आहे.
सध्या कोकण मंडळाकडे २० टक्के योजनेतील अंदाजे एक हजार घरे उपलब्ध असून यात आणखी अंदाजे ४ हजार घरांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार २० टक्के योजनेतील अंदाजे ५ हजार घरांसह म्हाडाच्या इतर योजनेतील अंदाजे ३ हजार घरे मिळून एकूण ८ हजार घरांसाठी सोडत काढली जाणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली.
मुंब्रा, विरार, पाचपाखडी, कल्याण, अंबरनाथ, नवी मुंबईसह अन्य ठिकाणच्या २० टक्के योजनेतील घरे सोडतीत समाविष्ट असतील. ३० चौरस मीटर ते ६० चौरस मीटर दरम्यानच्या क्षेत्रफळाची अल्प उत्पन्न गटातील ही घरे असण्याची शक्यता आहे. तर म्हाडा गृहप्रकल्पातील चितळसर-मानपाड्यातील अंदाजे ५०० घरे, बाळकुममधील अंदाजे ३५० घरे, तसेच विखुरलेल्या अंदाजे २ हजार घरांचा सोडतीत समावेश असेल. चितळसरमधील घरे अल्प उत्पन्न गटासाठी असतील आणि या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे ३४० चौरस फूट असेल. तर बाळकुममधील मध्यम उत्पन्न गटातील घरे ७२० चौरस फुटांची असतील.
सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांचा शोध पूर्ण करून त्यांची संख्या निश्चित करण्यात येईल आणि ऑगस्टअखेरीस अंदाजे ८ हजार घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, असेही राठोड यांनी सांगितले. कोकण मंडळाच्या या निर्णयामुळे महामुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न परवडणाऱ्या दरात पूर्ण करू पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
