मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घर परवडणाऱ्या किमतीत घेण्याची संधी लवकरच इच्छुकांना उपलब्ध होणार आहे. मात्र ही शेवटची संधी असणार आहे. यापुढे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून महामुंबईतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांची सोडत काढली जाणार नाही. १२ ऑगस्टपर्यंत २० टक्के उपलब्ध झालेल्या अंदाजे ५५० घरांसाठी महिन्याभरात जाहिरात काढली जाणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये सोडत पार पडणार आहे. या सोडतीत २० टक्के योजनेसह कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील अंदाजे ४५० घरांचाही समावेश असणार आहे. २० टक्के योजनेसह म्हाडा योजनेतील एकूण १००० घरांसाठी सोडत काढली जाणार असून या सोडतीद्वारे १५ लाख ते ४२ लाख रुपयांमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे.

मुंबई मंडळाच्या २६४० घरांसाठी नुकतीच सोडत पार पडली. आता इच्छुकांना कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा आहे. त्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कोकण मंडळाने अखेर सोडतीच्या जाहिरातीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पणन विभागाकडून जाहिरात तयार करण्याचे काम सुरू झाले असून महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. या सोडतीत २० टक्के योजनेतील अंदाजे ५५०, तर म्हाडा गृहनिर्माण योजनेतील अंदाजे ४५० घरांचा समावेश असेल.

एकूण अंदाजे १००० घरांसाठी सोडत निघेल, असेही त्यांनी सांगितले. याआधी मंडळाने ८००० घरांच्या सोडतीची घोषणा केली होती. यात २० टक्के योजनेतील अंदाजे ५५०० घरांचा समावेश असणार होता. मंडळाला या योजनेतून इतकी घरे उपलब्ध होणार होती. मात्र राज्य सरकारने ही योजना म्हाडाकडून काढून घेतली आणि पालिकांकडे वर्ग केली. त्यामुळे १२ ऑगस्टपूर्वी उपलब्ध झालेल्या घरांसाठी म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांनासोडत काढता येणार आहे. कोकण मंडळाला १२ ऑगस्टपूर्वी केवळ ५५० घरे उपलब्ध झाली आहेत. या घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता कोकण मंडळाची २० टक्के योजनेतील घरांची ही शेवटची सोडत आहे. परवडणाऱ्या दरात खासगी विकासकाच्या प्रकल्पातील घरे घेण्याची ही शेवटची संधी असणार आहे.

ठाणे, कल्याण – डोंबिवली, वसई – विरार आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ही ५५० घरे असून ही घरे ३० ते ४० चौरस मीटरची अर्थात ३२३ ते ४३१ चौरस फूट क्षेत्राची असतील. या घरांच्या किंमती १५ ते २५ लाख रुपयांपर्यंत असेल. तर चितळसर मानपाडा येथील म्हाडा गृहनिर्माण योजनेतील अंदाजे ४५० घरेही ३२३ ते ४३१ चौरस फुटांची असणार असून या घरांसाठी विजेत्यांना ४२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. महिन्याभरात १००० घरांसाठी जाहिरात काढली जाईल. त्यानंतर नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबरअखेरीस सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्याच्या तयारीला लागणे गरजेचे आहे.