मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरात घरे देण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अधिकाधिक घरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार आता अंबरनाथमध्ये पीएमएवाय योजनेअंतर्गत आणखी २५४३ घरे बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या २५४३ घरांपैकी कोहोज खुंटवलीमधील १४९३ घरांच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली, तर शिवगंगानगरमधील १०५० घरांच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात सोडतीद्वारे इच्छुकांना अंबरनाथमध्ये पीएमएवायअंतर्गत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

अत्यल्प आणि अल्प गटासाठी घरे

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्यासाठी केंद्र सरकारने पीएमएवाय योजना आणली. केंद्र सरकारच्या पीएमएवाय (शहरी) योजनेअंतर्गत कोकण मंडळाकडून मागील काही वर्षांपासून खोणी, भंडार्ली, गोठेघर, शिरढोण, विरार – बोळींज अशा ठिकाणी मोठ्या संख्येने घरे बांधून त्यांची विक्री करण्यात आली आहे.

हे प्रकल्प पूर्णत्वास आले असताना आता पीएमएवाय योजनेअंतर्गत आणखी घरे बांधण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार अंबरनाथमधील कोहोज खुंटवली येथे पीएमएवाय २.० अंतर्गत १४९३ घरांच्या कामाला नुकतीच मंडळाकडून सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. १४९३ घरांपैकी ६१७ घरे अत्यल्प उत्पन्न गटातील असून ८७६ घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत. यात २४ दुकानांचाही समावेश आहे. या प्रकल्पास २६ जूनला पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून मंडळाकडून आता या घरांच्या कामास सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दुकानांचाही समावेश, शिवगंगानमध्ये १३ दुकाने

कोहोज खुंटवलीसह शिवगंगानगर येथेही पीएमएवाय २.० अंतर्गत १०५० घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या नकाशा मंजुरीची कामे प्रगतीपथावर आहेत. आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन या घरांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. शिवगंगानगरमधील १०५० घरांपैकी ३३० घरे अत्यल्प उत्पन्न गटातील, तर ७२० घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत. या प्रकल्पातही १३ दुकानांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांतील घरांची कामे पूर्ण झाली तर अंबरनाथमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील इच्छुकांना २५०० हून अधिक घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ही बाब इच्छुकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.