मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने खोणी आणि शिरढोण येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) उभारलेल्या घरांसाठीच्या लाभार्थ्यांना अखेर मोठा दिलासा दिला. विविध सोयी-सुविधांसाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात मंडळाने कपात केली. ही कपात सुमारे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत आहे.
म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थी, विजेत्यांकडून संबंधित विभागीय मंडळ वीज, पाणी आणि इतर सेवांपोटी सेवाशुल्क आकारते. त्यानुसार खोणी-शिरढोण येथील पीएमएवाय योजनेतील लाभार्थ्यांनाही सेवाशुल्क आकारले जात असून हे सेवाशुल्क भरमसाठ असल्यामुळे लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त करून सेवाशुल्क कमी करण्याची मागणी कोकण मंडळाकडे केली होती. लाभार्थ्यांच्या मागणीवर कोकण मंडळाकडून कोणताही निर्णय होत नव्हता. दरम्यान, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी २१ मे २०२६ रोजी प्रकल्पस्थळाची पाहणी केली. त्यावेळीही रहिवाशांनी सेवाशुल्कात कपात करण्याची मागणी जयस्वाल यांच्याकडे केली. अखेर जयस्वाल यांनी लाभार्थ्यांची मागणी मान्य करून त्यांना मोठा दिलासा दिला. खोणी आणि शिरढोण या दोन्ही ठिकाणच्या घरांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करण्यात आली. यासंबंधीचे पत्र नुकतेच कोकण मंडळाकडून जारी करण्यात आले.
खाेणीसाठी ६२२ रुपये तर शिरढोणसाठी २७९ रुपयांची कपात
म्हाडाच्या पत्रानुसार खोणीतील घरांसाठी आकारण्यात येणाऱ्या प्रतिमाह २ हजार ४२२ रुपये इतक्या सेवाशुल्कात मंडळाने ६२२ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता खोणीतील लाभार्थ्यांना प्रतिमाह १ हजार ८०० रुपये असे सेवाशुल्क आकारले जाणार आहे. तर शिरढोणमधील घरांच्या प्रतिमाह १ हजार ९७९ रुपये अशा सेवाशुल्क दरात २७९ रुपयांची कपात करून ते आता प्रतिमाह १ हजार ७०० रुपये इतके करण्यात आल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. कोकण मंडळाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
