मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाण्यातील माजीवाडा येथे सात मजली वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सात मजली वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही प्रकल्पांसाठी निविदा अंतिम केल्या. पण आता मात्र या निविदा रद्द करून नव्याने निविदा मागविल्या जाणार आहेत. कारण आता एकऐवजी तीन चटईक्षेत्र निर्देशांकाचा (एफएसआय) वापर करण्याचे कोकण मंडळाने निश्चित केले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर नव्याने आराखडा तयार करून निविदा मागविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प तीन एफएसआयनुसार राबविण्यात येणार असल्याने वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठीचे वसतिगृह सातऐवजी आता थेट २१ मजल्यांचे होणार आहे.

राज्याच्या गृहनिर्माण धोरणात महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करताना एमएमआरएमध्ये भविष्यात नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने मुंबई आणि ठाण्यात महिला वसतिगृह, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाण्यातील माजीवडा येथील विवेकानंद नगर अभिन्यासातील अंदाजे १३०० चौरस मीटर जागेवर वृद्धाश्रम, तर १५०० चौरस मीटर जागेवर महिला वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव मान्य करून घेतला. दोन्ही सात मजली इमारतींचा आराखडा तयार करून त्यांच्या बांधकामासाठी स्वतंत्र दोन निविदाही मागविल्या. दरम्यान, निविदा प्रक्रिया सुरू असतानाच या प्रकल्पात अडथळा निर्माण झाला.

वृद्धाश्रम आणि वसतिगृहाची जागा ठाणे महानगरपालिकेने समूह पुनर्विकासात समाविष्ट केली. परिणामी, कोकण मंडळाच्या प्रस्तावास पालिकेने मान्यता देण्यास नकार दिला आणि प्रकल्प अडकला. मात्र मंडळाने ही जागा समूह पुनर्विकासातून वगळण्याची मागणी केली, त्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले आणि अखेर पालिकेने ही जागा समूह पुनर्विकासातून वगळून प्रकल्पांचा मार्ग मोकळा केला. प्रकल्पाचा मार्ग मोकळा केल्यानंतर निविदा अंतिम करण्यात आल्या. मात्र आता या निविदा रद्द करण्यात येणार आहेत. आता मंडळाने या दोन्ही प्रकल्पांसाठी एकऐवजी तीन एफएसआयचा वापर करून इमारती बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी मंडळाचे मुख्य अधिकारी विशाल राठोड यांना विचारले असता त्यांनी यास दुजोरा दिला.

तीन एफएसआयचामुळे आता वृद्धाश्रम आणि वसतिगृहाची इमारत २१ मजली होणार आहे. त्यामुळे आता खोल्यांची संख्याही वाढणार असून अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना निवारा उपलब्ध होणार आहे. जयस्वाल यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर नवा आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबवून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे.