मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सर्वात मोठ्या विरार-बोळींज गृहप्रकल्पातील घरे काही केल्या विकली जात नव्हती. नऊ हजारांहून अधिक घरे विक्रीवाचून धूळ खात पडून असल्याने कोट्यवधींचा महसूल अडकला होता. त्यामुळे म्हाडाची, कोकण मंडळाची चिंता वाढली होती.
मात्र आता ही चिंता दूर झाली असून ९ हजार ४०९ घरांपैकी ७ हजार ७६१ घरांची विक्री करण्यात मंडळ यशस्वी ठरले आहे. या घरविक्रीतून मंडळाला आतापर्यंत १ हजार ९४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आता विरार-बोळींजमधील केवळ १ हजार ६५८ घरांचीच विक्री बाकी आहे.
कोकण मंडळाने विरार-बोळींजमध्ये दहा हजारांहून अधिक घरांचा सर्वात मोठा गृहप्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पातील घरे टप्प्याटप्प्याने बांधून घरांसाठी सोडत काढली. मात्र पाण्याची सोय नसल्याने आणि इतर सोयीसुविधांचा अभाव असल्याने या घरांना प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी या योजनेतील तब्बल ९ हजार ४०९ घरे विक्रीवाचून धूळ खात पडून होती. ही घरे विकली जात नसल्याने म्हाडाचा महसूलही अडकला होता.
घरे विकण्यासाठी कोकण मंडळाने अनेक पर्यायांचा विचार केला, विविध क्लृप्त्या लढवल्या. अगदी रेल्वे स्थानक, बाजारात स्टॉल लावून घरांची जाहिरातही केली. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत घरांचा समावेश केला. खासगी संस्थांची नियुक्तीही घरे विकण्यासाठी करण्यात आली. मात्र, तरीही घरे विकली जात नव्हती.
अखेर मंडळाच्या या सर्व प्रयत्नांना यश आले मिळाले असून शिल्लक असलेल्या ९ हजार ४०९ घरांपैकी आतापर्यंत ७ हजार ७६१ घरांची विक्री झाल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. या घरविक्रीतून मंडळाला १ हजार ९४० कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित १ हजार ६५८ घरेही लवकरच विकली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विरार-बोळींजमधील ९ हजार ४०९ घरांपैकी ६ हजार ६१० घरांची विक्री झाली असून या घरांचा ताबा विजेत्यांना देण्यात आला आहे. तर १ हजार १४१ घरांचीही विक्री झाली असून या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता संकेतस्थळावर केवळ १ हजार ६५८ घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. या शिल्लक घरांची विक्री सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले.
