Premium

म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यास सात दिवसांची मुदतवाढ

म्हाडाच्या कोकण मंडळाने मे २०२३ मध्ये काढलेल्या सोडतीतील २,२१९ विजेत्यांना स्वीकृती पत्र पाठविण्यात आले असून विहित मुदतीत १०० हून अधिक विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही.

mhada kokan lottery
म्हाडा कोकण लॉटरी

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने मे २०२३ मध्ये काढलेल्या सोडतीतील २,२१९ विजेत्यांना स्वीकृती पत्र पाठविण्यात आले असून विहित मुदतीत १०० हून अधिक विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे आता या विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार असून शनिवार, १० जूनपासून या मुदतवाढीस सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण मंडळाने ४,६५४ घरांसाठी १० मे रोजी सोडत काढली होती. सोडतीत केवळ २,२१९ अर्जदार विजेते ठरले. सुमारे २,३४५ घरांसाठी अर्जच आले नाहीत. त्यामुळे या घरांची विक्री होऊ शकली नाही. या सोडतीमधील २,२१९ विजेत्यांना मंडळाने स्वीकृती पत्र पाठविले आहेत. या पत्रानुसार विजेत्यांना घराची स्वीकृती नमूद करायची आहे. तसेच काही कारणाने घर परत करायचे असल्यास या पत्राद्वारे कळविणे आवश्यक आहे. मात्र विहित मुदतीत अंदाजे १३२ विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे आता या विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही मुदतवाढ शनिवारपासून दिली जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई : काळबादेवीमधील इमारतीला भीषण आग, एक जखमी

तात्पुरते देकार पत्रही लवकरच

नव्या प्रक्रियेनुसार सोडतीआधीच विजेत्यांची पात्रता निश्चिती झाली आहे. त्यामुळे सोडतीनंतर विजेत्यांना तात्काळ तात्पुरते देकार पत्र पाठवून त्यांच्याकडून घरांची रक्कम भरून घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच निवासी दाखला मिळालेल्या घरांचा ताबाही देण्यात येणार आहे, असा दावा म्हाडाने केला होता. मात्र कोकण मंडळाने सोडत काढल्यानंतर एक महिना झाला तरी अद्याप तात्पुरते देकार पत्र पाठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे निवासी दाखला मिळालेल्या घरांचा ताबा विजेत्यांना देण्यास विलंब होत आहे. स्वीकृती पत्राची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तात्पुरते देकार पत्र पाठविण्याची प्रक्रियाही पूर्ण करता आलेली नाही. मात्र घरासाठी स्वीकृती दिलेल्यांना लवकरच तात्पुरते देकार पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mhada konkan mandal lottery 2023 seven days extension submission of acceptance letter mumbai print news ysh

First published on: 09-06-2023 at 11:56 IST
Next Story
मुंबई : काळबादेवीमधील इमारतीला भीषण आग, एक जखमी