मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांना प्रचंड मागणी असून घरांच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
सोडतीत २०२५ मध्ये खंड पडला, पण आता मात्र या वर्षात सोडत काढण्याचा निर्णय घेऊन मुंबई मंडळ कामाला लागले आहे. सध्या घरांची शोधाशोध सुरू असून किमान ५ हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या इतकी घरे तयार नसल्याने निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा समावेश सोडतीत करण्याचाही निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार लवकरच घरांची संख्या, किंमती निश्चित करून मार्चअखेर वा एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.
मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी २००७ ते २०१९ दरम्यान दरवर्षी सोडत काढण्यात आली. मात्र २०२० ते २०२२ दरम्यान सोडतीत खंड पडला. इच्छुकांची प्रतीक्षा लांबली आणि थेट २०२३ ला सोडत निघाली. त्यानंतर २०२४ लाही मुंबई मंडळाने सोडत काढली. मंडळ २०२५ मध्येही सोडतीची तयारी करीत होते. मात्र सोडतीसाठी घरेच तयार नसल्याने मंडळाला २०२५ मध्ये सोडत काढता आली नाही. सोडतीत पुन्हा खंड पडला.
पण आता मात्र २०२६ मध्ये सोडत काढण्यावर मंडळ ठाम आहे. त्यामुळेच तयार घरे नसली तरी सोडत काढण्यासाठी मंडळाने निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा समावेश सोडतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पत्राचाळीतील २३९८ घरांचा, विक्रोळी, कन्नमवारनगरमधील १३०० घरांचा, शीव, प्रतीक्षानगरमधील ५०० घरांचा समावेश सोडतीत केला जाणार आहे.
ही सर्व घरे निर्माणाधीन आहेत. निर्माणाधीन घरांची संख्या ४२०० पर्यंत जाणार आहे. यात काही विखुरलेल्या वा तयार घरांचा समावेश करून ५ हजार घरांची सोडत काढण्याचे नियोजन सध्या सुरू असल्याची माहिती म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
मार्चअखेर वा एप्रिलच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मेमध्ये मुंबईतील ५ हजार घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात निर्माणाधीन आणि अल्प, मध्यम, तसेच उच्च गटातील घरे सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वाधिक मागणी असलेल्या अत्यल्प गटातील घरे सोडतीत असतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर याचे उत्तर मिळणार आहे. त्याचवेळी निर्माणाधीन घरांचा समावेश सोडतीत असून यातील काही घरे २०२७, तर काही घरे २०२९ मध्ये पूर्ण होणार आहेत. या घरांच्या विजेत्यांकडून विकासकाप्रमाणे पाच टप्प्यात घराची विक्री किंमती वसूल केली जाणार आहे. त्यामुळे अर्जदार विजेते ठरतील, पण त्यांना हक्काच्या घराच्या ताब्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

