scorecardresearch

मराठवाड्यातील इच्छुकांची घराची प्रतीक्षा संपली; म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातील ९३६ घरांसाठी २२ मार्च रोजी सोडत

आता पुण्यापाठोपाठ औरंगाबादमधील घरांची सोडतही मार्गी लागली आहे.

MHADA
म्हाडा पुणे मंडळाकडून गेल्या सात वर्षात सर्वाधिक घरांसाठी सोडत (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळाची अनेक महिन्यांपासून रखडलेली सोडती अखेर मार्गी लागली आहे. औरंगाबाद मंडळाने ९३६ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून गुरुवारपासून अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्च सोडी सोडत काढण्यात येणार आहे.

हेही वाचा- बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

मुंबई, कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांच्या घरांच्या सोडतीची तयारी मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. पण प्रत्यक्षात केवळ पुणे मंडळाच्या सोडतपूर्व प्रक्रियेला (नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृती) सुरुवात झाली. इतर मंडळाच्या सोडती विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. आता पुण्यापाठोपाठ औरंगाबादमधील घरांची सोडतही मार्गी लागली आहे. औरंगाबाद मंडळातील ९३६ घरांसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी दिली.

हेही वाचा- मुंबई : तळीयेतील बाधित कुटुंबांसाठीच्या ६६ घरांचे काम मार्चमध्ये पूर्ण, २०० घरांच्या प्रकल्पाला अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाकडून वेग

जाहिरातीनुसार औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मनाबाद, हिंगोली आणि परभणी येथील ९३६ घरांसाठी २२ मार्च रोजी औरंगाबादमधील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी ९ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान अर्जविक्री – स्वीकृती प्रकिया सुरू राहणार आहे. आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १३ मार्च अशी आहे. या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील ६०५ घरांचा समावेश आहे. साडेसात लाख ते साडेनऊ लाख रुपये अशी या घरांची किंमत आहे.

हेही वाचा- PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी मुंबईत ड्रोनसह पतंग उडवण्यावर बंदी; पोलिसांकडून निर्देश जारी

अनामत रक्कमेत वाढ नाही

म्हाडा सोडतीच्या प्रक्रियेत बदल करताना अनामत रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार सर्व गटांच्या अनामत रक्कमेत भरमसाठ वाढ करण्यात येणार आहे. मात्र यामुळे इच्छुकांना अर्ज भरणे महाग होणार आहे. यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर या निर्णयावर नाराजी व्यक्त होऊ लागली. त्यामुळे अखेर अत्यल्प आणि अल्प गटांच्या अनामत रक्कमेत वाढ करण्यात येणार नाही, असे म्हाडा प्राधिकरणाने जाहीर केले. मात्र प्रत्यक्ष पुणे मंडळाने सोडत जाहीर करताना सर्व गटाची अनामत रक्कम पाच पट वाढवून प्राधिकरणाच्या निर्णयापासून घुमजाव केले. तर कोकण मंडळानेही पुणे मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या आगामी सोडतीच्या सर्व गटांच्या अनामत रक्कमेत दुप्पटीने वाढ केली. औरंगाबाद मंडळाने मात्र अनामत रक्कमेत कोणतीही वाढ केलेली नाही. हा अर्जदारांसाठी मोठा दिलासा आहे. अनामत रक्कम न वाढल्याने अत्यल्प गटासाठी पाच हजार रुपये, अल्पसाठी १० हजार रुपये, मध्यमसाठी १५ हजार रुपये आणि उच्चसाठी २० हजार रुपये अशी ही रक्कम आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:19 IST