मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने आपल्या अखत्यारइतील विविध प्रकारच्या ८३ मालमत्तांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० अनिवासी भूखंड, २ निवासी भूखंड, १ निवासी आणि अनिवासी भूखंड, ४६ दुकाने तसेच ४ सुविधा सभागृहांच्या विक्रीसाठी मंडळने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. २८ ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार असून ४ सप्टेंबरला ई-लिलावाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह लातूर, बीड आणि नांदेडमध्ये भूखंड, दुकाने खरेदी करण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध झाली आहे.

म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांकडून गृहनिर्मिती करून सोडतीद्वारे घरांची विक्री केली जाते. तर दुसरीकडे गृहप्रकल्पांमध्ये काही दुकानेही बांधली जातात. तसेच मंडळाकडे विविध वापरासाठी काही भूखंडही उपलब्ध असतात. त्यामुळे या भूखंड आणि दुकानांची विक्री ई-लिलाव पद्धतीने केली जाते. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर मंडळाने विविध प्रकारच्या ८३ मालमत्तांच्या ई-लिलाव प्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यानुसार म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारितील ३० अनिवासी भूखंड, २ निवासी भूखंड, १ निवासी व अनिवासी भूखंड, ४६ दुकाने व ४ सुविधा हॉलच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावासाठी ऑनलाइन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला ‘गो लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत मंडळाचे मुख्य अधिकारी वैभव केदारे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

गुरुवार, ३० जुलैपासून ई-लिलावासाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी वैभव केदारे यांनी दिली. इच्छुकांना २८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव http://www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. तर ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता https://mhada.gov.in व http://www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

ई-लिलावातील ८३ मालमत्ता छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, बीड, लातूरमधील आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, तिसगाव, नक्षत्रवाडी, देवळाई, मुकुंदवाडी येथे व टोकवाडी (जि. जालना), मुदखेड (जि. नांदेड), म्हाळजा (जि. नांदेड), अर्धापूर (जि. नांदेड), बाभुळगाव रोड (जि. लातूर) येथे अनिवासी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मूर्तिजापूर, देवळाई, र्सूल, चिकलठाणा येथे व मुदखेड (जि. नांदेड), उदगीर (जि. लातूर), अंबाजोगाई (जि. बीड), हिंगोली येथे दुकाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. टोकवाडी (जि. जालना) व हिंगोली येथे सुविधा हॉल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.