४ मार्चपासून घरखरेदीची प्रक्रियाट
लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ११८ घरांची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विक्री करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार ५ फेब्रुवारीपासून नोंदणीस सुरुवात होणार होती. मात्र ‘बुक माय होम’ प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी सुरू होण्यापूर्वीच नोंदणी प्रक्रिया रद्द करून ती पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई मंडळावर ओढवली होती. आता तांत्रिक अडचणी दूर झाल्याने मंगळवारपासून (१७ फेब्रुवारी) ११८ घरांच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी सुरू होणार आहे. तर ४ मार्चपासून अर्ज भरण्याच्या आणि अनामत रक्कम भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
मुंबई मंडळाच्या सोडतीतील रिक्त घरांचा प्रश्न गंभीर बनला होता. दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही घरे विकली जात नसल्याने या घरांचे काय करायचे, असा प्रश्न मंडळासमोर होता. त्यामुळे अखेर मंडळाने नियमानुसार या घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ अंतर्गत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कामास सुरुवात करण्यात आली; मात्र या योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्यास विलंब झाला.
३ फेब्रुवारीला ११८ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणीस सुरुवात केली जाणार होती. त्यानंतर १२ फेब्रुवारीपासून अर्ज भरणे, अनामत रक्कम भरणे आणि ती भरल्यानंतर ४८ तासांत घराच्या एकूण रकमेच्या १० टक्के रक्कम भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार होती. मात्र प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ती पुढे ढकलण्यात आल्याचे मंडळाने जाहीर केले.
‘बुक माय होम’ प्रणालीतील तांत्रिक अडचणींसह इतर कारणांमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलावी लागली. आता मंगळवारपासून (१७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता नोंदणीस सुरुवात होणार आहे. तर ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना नोंदणी व पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
अनामत रक्कम भरल्यानंतर ४८ तासांत घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे अर्जदारांना बंधनकारक असणार आहे; अन्यथा त्यांचा घरावरील दावा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अनामत रक्कम आणि घराच्या किमतीपैकी १० टक्के रक्कम वेळेत जमा करणे आवश्यक आहे. १० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित ९० टक्के रक्कम भरण्यासाठी अर्जदाराला ९० दिवसांचा कालावधी मिळणार आहे. घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर घराचे वितरण करण्यात येणार आहे.

