मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत बुधवारी सकाळी ११ वाजता ११८ घरांच्या विक्रीस सुरुवात झाली. अनामत रक्कम भरून घर खरेदीची प्रक्रिया सुरू होताच अवघ्या १० मिनिटांत वडाळ्यातील सर्व २७ घरे विकली गेली. सायंकाळी ५ पर्यंत ११८ घरांपैकी ५१ घरांची विक्री झाली. विकल्या गेलेल्या ५१ घरांपैकी ९ अर्जदारांनी घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणाही केला. मुंबई मंडळाच्या प्रथम प्राधान्य योजनेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. मात्र मंडळाची महागडी घरे अद्याप विकली गेलेली नाहीत. ताडदेवमधील आठ कोटी रुपयांच्या घरांकडे इच्छुकांनी पुन्हा पाठ फिरवली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमधील ११८ घरे काही कारणांमुळे दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेली नव्हती. ही घरे महाग असल्याने, तसेच परवडणारी रिक्त घरे योग्य परिसरात नसल्याने इच्छुकांनी व विजेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे ही ११८ रिक्त घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विकण्याचा निर्णय मंडळाने घेतला. यासाठी फेब्रुवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या योजनेत पात्रतेच्या अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे उत्पन्न मर्यादा व आयकर प्रमाणपत्राची अट लागू नाही. स्वतःचे हक्काचे घर असले किंवा सरकारी योजनेतील घर असले तरी या योजनेअंतर्गत घर घेता येते. त्यामुळे रिक्त घरे विकण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरते. काही दिवसांपूर्वी ११८ घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बुधवारपासून प्रत्यक्ष घरविक्री प्रक्रियेला सुरुवात झाली.
या ११८ घरांच्या विक्रीला बुधवारी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मुंबईत प्रथमच अशा पद्धतीने घरांची विक्री होत असल्याने या योजनेला कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत उत्सुकता होती. वडाळ्यातील ४२ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या २७ घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. अवघ्या १० मिनिटांत सर्व २७ घरे विकली गेल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अनामत रक्कम भरून २७ घरे अर्जदारांनी विकत घेतली. मात्र अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांपैकी कोणीही येत्या ४८ तासांत घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा केला नाही, तर त्यांचा घरावरील दावा रद्द होणार असून अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. त्यामुळे २७ घरांपैकी किती घरे प्रत्यक्षात विकली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यानंतर याचे चित्र स्पष्ट होईल.
वडाळ्यातील घरांसह अन्य काही ठिकाणच्या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ११८ पैकी ५१ घरे विकली गेली असली, तरी ताडदेवमधील आठ कोटी व सव्वा सहा कोटी रुपये किमतीच्या एकूण सहा घरांना प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र या घरांसाठी काही जणांनी अनामत रक्कम भरल्याचेही समजते. त्यामुळे या घरांवर दावा करून ती प्रत्यक्ष विकत घेतली जातात का, याकडे मुंबई मंडळाचे लक्ष लागले आहे.तुंगा-पवईसह कोट्यवधी रुपये किमतीच्या अन्य काही ठिकाणच्या घरांनाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र आज पहिलाच दिवस असून अर्जदार विचारपूर्वक घरांवर दावा करून १० टक्के रकमेचा भरणा करतील आणि घरे विकत घेतील, असा विश्वास मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शेवटचे घर विकले जाईपर्यंत प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ११८ घरे विकण्यासाठी मंडळाला किती कालावधी लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
