मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अंदाजे २५०० घरांसाठी सोडत काढण्याच्या तयारीला वेग आला आहे. मंगळवारी, ३१ मार्चला सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करून मंगळवारपासूनच नोंदणी-अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरूवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी २०२४ नंतर सोडत काढली जाणार असली तरी ती गरीबांसाठी नव्हे तर श्रीमंतांसाठी असणार आहे.
या सोडतीतील अधिकाधिक घरे मध्यम आणि उच्च गटासाठी असून अत्यल्प, अल्प गटासाठी तुरळक घरे असणार आहेत. त्यातही सोडतीतील घरांच्या किंमती भोवळ आणणाऱ्या आहेत. सोडतीत ३२ लाखांपासून ते थेट आठ कोटींपर्यंत किंमत असलेल्या घरांचा समावेश असून सर्वाधिक घरे एक कोटीपेक्षा अधिक किंमतीची आहेत.
मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुकांचे डोळे लागलेले असतात. अशात २०२५ मध्ये सोडत न निघाल्याने इच्छुकांची प्रतीक्षा लांबली. पण २०२६ मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेत मुंबई मंडळाने घरांची शोधाशोध सुरू केली. त्यानुसार अंदाजे २५०० घरे शोधून काढली आहेत. घरांच्या किंमती निश्चित झाल्या असून आता सोडतीची जाहिरात तयार करण्याचे काम मुंबई मंडळाकडून सुरू आहे. त्यानुसार मंगळवार, ३१ मार्चला जाहिरात प्रसिद्ध करून त्याच दिवशी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
त्यामुळे पुढील आठवड्यापासून इच्छुकांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येणार असून आता कागदपत्रांची आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करण्याच्या तयारीला इच्छुकांनी लागणे गरजेचे आहे. एका वर्षाच्या खंडानंतर मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडत निघणार असल्याने इच्छुकांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्यांची मोठी निराशा होणार आहे.
या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी तुरळक घरे समाविष्ट आहेत. त्याचवेळी सर्वाधिक घरे मध्यम आणि उच्च गटासाठी आहेत. तर सोडतीतील घरे महागडी असणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. पहाडी गोरेगावमधील अत्यल्प गटातील घरे वगळता इतर सर्व घरे महाग आहेत. पहाडी गोरेगावमधील घरांच्या किंमती ३२ लाख रुपये अशी असण्याची शक्यता आहे.
विक्रोळी कन्नमवार नगरमधील सर्वाधिक १२२१ घरे सोडतीत समाविष्ट असून ही घरे अंदाजे ८०० चौ. फूट क्षेत्रफळाची आहेत. या घरांच्या किंमती अंदाजे ८० लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर बऱ्याच वर्षांनंतर वांद्र्यातील घरांचा समावेश सोडतीत असणार आहे. वांद्रे येथील एमआयजी वसाहतीतील एका सोसायटीच्या पुनर्विकासासाठी मंडळाला सोडतीसाठी २६ गाळे उपलब्ध झाले आहेत. या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे ६५० चौ. फूट असून मध्यम गटातील घरांच्या किंमती भोवळ आणणाऱ्या आहेत. या घरांसाठी विजेत्यांना ३ कोटी ३६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर बोरिवलीतील चार घरांच्या किंमती प्रत्येकी एक कोटी १६ लाख रुपये अशा असणार आहेत. त्याचवेळी पंतनगर येथील घरांच्या किंमती १ कोटी ७ लाख ते १ कोटी ९२ लाख दरम्यान असणार आहेत. तुंगा, पवईतील घरे १ कोटी ३५ ते १ कोटी ९८ लाख दरम्यान विकली जाणार आहेत.
जूहूमधील एक घरही सोडतीत समाविष्ट असून मध्यम गटातील या घराची किंमत ४ कोटी ८४ लाख रुपये अशी असणार आहे. त्याचवेळी सर्वात महागडी घरे ताडदेव क्रिसेंट टॉवरमधील असणार आहेत. २०२३ च्या सोडतीत क्रिसेंट टॉवरमधील आठ घरे सोडतीत समाविष्ट करण्यात आली होती. यातील सहा घरांना सोडतीत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुढे ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट करण्यात आली. तर दोन विजेत्यांनी घरे परत केल्याने ती विक्रीवाचून पडून होती. त्यामुळे या दोन घरांचा समावेश आगामी सोडतीत करण्यात आला असून या घरांच्या किंमती आठ कोटी असणार आहे. २०२३ मधील सोडतीत या घरांच्या किंमती अंदाजे सात कोटींपेक्षा कमी होत्या. सोडतीतील घरांच्या या किंमती पाहता इच्छुकांच्या, सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता आहे.
पीएमएवायमधील १० घरे
आगामी सोडतीत अत्यल्प, अल्प गटासाठी तुरळक घरे आहेत. मात्र त्याचवेळी पहाडी गोरेगावमधील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त १० घरांचा सोडतीत समावेश आहे. ३२२ चौ. फूटाच्या या घरांसाठी ३२ लाख रुपये अशी किंमत असणार आहे. मात्र पीएमएवायमधील या घरांसाठी तुमचे भारतात कुठेही पक्के घर नसावे अशी अट असणार आहे. तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत असणारेच ही घरे घेऊ शकणार आहेत. सोडतीत परवडणारी हीच घरे असणार असल्याने या घरांसाठी इच्छुकांची मागणी असेल, असे म्हटले जात आहे. ……………..
