मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांसाठीची नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया शुक्रवारी संपुष्टात आली. शेवटच्या दिवसापर्यंत २,६४० घरांसाठी ७६ हजार अर्ज प्राप्त झाले. अनामत रक्कमेसह प्राप्त अर्जांची संख्या ८० हजारांचा टप्पाही गाठू शकलेली नाही. मागील काही वर्षांच्या तुलनेत या सोडतीला मिळालेला हा सर्वात कमी प्रतिसाद आहे.
अल्प प्रतिसादामुळे सोडतपूर्व प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ
बोरिवली, मालाड, मालवणी, गोरेगाव, अंधेरी, जूहू, वांद्रे, दादर, ताडदेव, विक्रोळी, कन्नमवारनगरसह अन्य काही ठिकाणच्या २,६४० घरांसाठी मुंबई मंडळाने ३० मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली होती. सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार ३० मार्च ते ३० एप्रिलदरम्यान अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार होती. मात्र २७ एप्रिलपर्यंत अनामत रक्कमेसह केवळ २९ हजार अर्ज सादर झाल्याने मुंबई मंडळाने २७ एप्रिलला अर्जविक्री-स्वीकृतीस १५ दिवसांची मुदतवाढ दिली.
या मुदवाढीमुळे १५ मे रोजी काढण्यात येणारी सोडत ५ जूनवर गेली. दुसऱ्या मुदतवाढीनुसार १५ मेला अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार होती. मात्र अवघे काही दिवस शिल्लक असतानाही सोडतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सोडतपूर्व प्रक्रियेस दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवली. तर ५ जूनची सोडतीही अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली. दुसऱ्या मुदतवाढीनुसार २९ मे रोजी अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपुष्टात आली.
दुसऱ्या मुदतवाढीनंतरही प्रतिसाद अल्प
अर्जस्वीकृतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ९७ हजार ६१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ७५ हजार ३६६ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवसाच्या आरटीजीएस-एनईएफटीसह प्राप्त झालेल्या अर्जांची अंतिम संख्या मुंबई मंडळाला प्राप्त झालेली नाही. ही संख्या ५०० ते १००० च्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे २६४० घरांसाठी ७६ हजार अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. तर अर्जांची संख्या ८० हजारांचा टप्पा गाठू शकलेली नसून मागील काही वर्षांतील हा सर्वात कमी प्रतिसाद आहे.
मुंबई मंडळाच्या सोडतीला मागील १५ वर्षांत लाखाच्या वर अर्ज प्राप्त झालेले आहेत. काही सोडतीतील घरांसाठी चार ते पाच लाख अर्जही प्राप्त झाले होते. मागील दोन सोडतींची संख्या पाहता या सोडतीसाठीही एक लाखांच्या वर अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे हा प्रतिसाद अत्यंत कमी मानला जात आहे. महागडी घरे आणि अत्यल्प गटासाठी केवळ ५ टक्के घरे सोडतीत असल्याने सोडतीला कमी प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले जात आहे.
प्राप्त अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्या घरांना किती अर्ज प्राप्त झाले, कोणती घरे नाकारली हे स्पष्ट होईल. दरम्यान, सोडतपूर्व प्रक्रियेस दुसरी मुदतवाढ देताना मुंबई मंडळाने सोडतीची तारीख लवकरच प्रसिद्ध करू, असे जाहीर केले होते, मात्र सोडतपूर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असतानाही सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे अर्जदारांचे लक्ष सोडतीच्या तारखेकडे लागले असून मुंबई मंडळाने लवकरात लवकर तारीख जाहीर करावी, अशी मागणी अर्जदारांकडून होत आहे.
