मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीतील घरे महागडी असल्याने मंडळावर टीका होत आहे. दुसरीकडे याच कारणाने सोडतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. घरे महागडी असल्याच्या टीकेनंतर मंडळाने घरांच्या किंमती कमी करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार मंडळाने गुरुवारी घरांच्या किंमती कमी केल्या, मात्र केवळ विक्रोळीतील १२२१ घरांच्याच किंमती कमी करण्यात आल्या आहेत.

या किंमतीही केवळ ७.५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. इच्छुकांची, अर्जदारांची २५ ते ३० टक्क्यांनी आणि सर्व घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी असताना केवळ विक्रोळीतील घरांच्या आणि त्याही केवळ साडेसात टक्क्यांनीच किंमती कमी केल्याने अर्जदारांना, इच्छुकांना तितकासा दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे. सर्वच घरे महागडी मुंबई मंडळाच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येते. त्यामुळे मुंबईतील मंडळाच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले असते. अशात २०२५ मध्ये मुंबईतील घरांसाठी सोडत निघाली नाही.

२०२६ मध्ये सोडत काढण्याचे जाहीर करणाऱ्या मुंबई मंडळाने ३० मार्चला सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात केली. मात्र जाहिरातील घरांच्या किंमती पाहून इच्छुकांना भोवळ आली. मध्यम आणि उच्च गटातील घरांच्या किंमती ४ ते ७ कोटींच्या घरात होत्याच, पण अत्यल्प आणि अल्प गटातील घरांच्या किंमतीही गगनाला भिडल्याने इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. महत्त्वाचे म्हणजे अल्प गटातील काही घरांच्या किंमती दोन कोटींच्या घरात असल्याने म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांच्या उद्दिष्टाबाबातच प्रश्न उपस्थित झाले.

घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार मंडळाने घरांच्या किंमती कमी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. २६४० घरांच्या सोडतीतील घरांच्या किंमती कमी होतील यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम लोकसत्ताने दिले होते. त्यानुसार अखेर मंडळाने सोडतीतील १२२१ घरांच्या किंमती कमी केल्या आहेत. वाहनतळाची जागा विनामूल्य विक्रोळीतील संकेत क्रमांक ५३८ मधील ४८० घरे सोडतीत उपलब्ध असून या घरांच्या किंमती १ कोटी ४५ लाख ५८ हजार ३०७ रुपये ते १ कोटी ४७ लाख ९७ हजार ९९२ रुपये अशा होत्या. या घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कपात झाल्याने ही घरे आता १ कोटी ३४ लाख ६६ हजार ४३४ रुपये ते १ कोटी ३६ लाख ८८ हजार १४३ रुपये अशा किंमतीने विकली जाणार आहेत.

संकेत क्रमांक ५३९ मधील ७४१ घरांच्या किंमती १ कोटी ४५ लाख ७४ हजार ९४२ रुपये ते १ कोटी ४८ लाख १४ हजार ९०१ रुपये अशा होत्या. या किंमतीतही ७.५ टक्क्यांनी कपात झाल्याने ही घरे आता १ कोटी ३४ लाख ८१ हजार ८२१ रुपये ते १ कोटी ३७ लाख ०३ हजार ७८३ रुपये अशा किंमतीत विकल्या जाणार असल्याची माहिती मुंबई मंडळाने दिली आहे. या दोन्ही संकेत क्रमांकात एका घरामागे एक अशी वाहनतळाची जागा देण्यात आली असून ही जागा विनामूल्य विजेत्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान सोडतीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने आता १५ मेपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती सुरू राहणार आहे. तर ५ जूनला सोडत काढली जाणार आहे. मंडळाने विक्रोळीतील घरांच्या किंमती कमी केल्या असल्या तरी इतर घरेही महागच असल्याचे म्हणत आता इच्छुकांकडून, अर्जदारांकडून इतर घरांच्या किंमतीही कमी करण्याची मागणी होत आहे.