मुंबई : म्हाडाची सोडत संगणकीय प्रणाली आणि घर वितरणासंबंधीची संगणकीय प्रणाली उत्कृष्ट, कार्यक्षम असल्याचा दावा म्हाडाकडून केला जातो. मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे पुणे मंडळाची सोडत मागील कित्येक महिन्यांपासून अडकली आहे. आता मुंबई मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील १२० घरांसाठीच्या अर्ज नोंदणीलाही आता तांत्रिक अडचणीचा फटका बसला आहे. तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारपासून (५ फेब्रुवारी) सुरू होणारी अर्ज नोंदणी पुढे ढकलण्याची नामुष्की मंडळावर ओढवली आहे. तर अर्ज नोंदणीची नवीन तारीखही मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुकांना आता सोडतीशिवाय म्हाडाचे घर घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई मंडळाच्या सोडतीतील मध्यम आणि उच्च गटातील घरे महागडी असल्याने विकली जात नसल्याचे चित्र आहे. उत्पन्न आणि घरांच्या किंमती यात मोठी तफावत असल्याने सर्वसामान्यांना ही घरे परवडत नसल्याने मुंबई मंडळातील १२० घरे रिक्त आहेत. ही रिक्त घरे ‘प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विकण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरांची विक्री सुरू होईल असे मंडळाने जाहीर केले. मात्र ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरविक्री अनेक कारणाने रखडली. पण मंगळवारी मंडळाने १२० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली.

या जाहिरातीनुसार गुरुवार, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीस सुरुवात होणार होती. ५ ते १२ फेब्रुवारीदरम्यान इच्छुकांना नोंदणी करता येणार होती. त्यानंतर १२ फेब्रुवारीपासून प्रत्यक घरविक्रीला सुरुवात होणार होती. ‘बुक माय होम’ संकेतस्थळावर आपल्या पंसतीचे घर निवडून त्या घरासाठी निश्चित अनामत भरून पुढे ४८ तासांत घराच्या एकूण विक्री किंमतीच्या १० टक्के रक्कम अर्जदाराला भरावी लागणार होती. ४८ तासांत १० टक्के रक्कम भरणाऱ्या अर्जदाराला घराचे वितरण केले जाणार होते. तर ९० टक्के रक्कम पुढील ९० दिवसांत भरल्यानंतर संबंधित अर्जदाराला घराचा प्रत्यक्ष ताबा दिला जाणार होता. शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर ४८ तासांत १० टक्के रक्कम न भरल्यास अर्जदाराचा घरावरील दावा संपुष्टात येईल आणि पुढील अर्जदाराला संधी मिळणार आहे. मात्र आता ही संपूर्ण प्रक्रियाच लांबणीवर पडली आहे.

प्रथम प्राधान्य योजनेच्या संगणकीय प्रणालीत काही तांत्रिक अडचण आल्याने गुरुवारपासून सुरू होणारी अर्ज नोंदणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती म्हाडाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. मात्र ही नोंदणी पुढे केव्हापासून सुरू होणार याची कोणतीही माहिती म्हाडाकडून, मुंबई मंडळाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोडतीशिवाय म्हाडाचे घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आता वाट पाहावी लागणार आहे.