मुंबई : मुंबईत सोडतीशिवाय वा म्हाडाच्या कोणत्याही अटींशिवाय घर घेण्याची संधी अखेर इच्छुकांना मिळणार असून प्रथम येणाऱयास प्राधान्य योजनेतील १२० घरांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मंगळवारी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून नोंदणीस सुरुवात होणार असून पुढील आठवड्यापासून बुक माय शोच्या धर्तीवर बुक माय होमप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत सोडतीशिवाय घर घेण्यासाठी इच्छुक असणार्यांना अनामत रक्कम आणि घराच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रक्कम तयार ठेवावी लागणार आहे. कारण नोंदणी झाल्यानंतर आपल्या आवडीचे घर निवडून तात्काळ अनामत रक्कम आणि त्यानंतर ४८ तासात घराची १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक असेल. अन्यथा घरावरचा दावा संपुष्टात येणार आहे.

मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. मात्र, मागील काही वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या किंमतीत मोठी वाढ होत असून उत्पन्न मर्यादा आणि घरांच्या किंमती यात मोठी तफावत आहे. परिणामी महागडी, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरे विक्रीवाचून रिक्त राहत आहेत. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही घरे विकली जात नसल्याने मंडळाचा महसूल अडकून राहत आहेत. त्यामुळे मंडळाने म्हाडा प्राधिकरणाच्या परवानगीने मागील दोन-तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या घरांची विक्री प्रथम येणाऱयास प्राधान्य तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये या योजनेअंतर्गत घरांची विक्री सुरु होणे अपेक्षित होते. मात्र ही योजना अनेक कारणाने लांबणीवर पडली होती. आता मंडळाने ही योजना मार्गी लावली ५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजल्यापासून पुढील पाच-सहा दिवस इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी झाल्यानंतर नोंदणीधारकांना बुक माय होमवर जाऊन आपल्याला हवे ते घर अनामत रक्कम भरुन खरेदी करता येणार आहे. अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना ४८ तासात घराच्या एकूण रक्कमेच्या १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ४८ तासात ही रक्कम न भरल्यास अर्जदाराचा दावा संपुष्टात येईल आणि ते घर खरेदी करण्याची संधी पुढील नोंदणीधारकास मिळेल. प्रथम प्राधान्य योजनेतील घरांची विक्री आता सुरु होणार असल्याने सोडतीशिवाय म्हाडाचे घर घेण्याची संधी मुंबईकरांनी आता उपलब्ध होणार आहे.

प्रथम प्राधान्यमधील घरांसाठी उत्पन्नाची, उत्पन्न मर्यादेची, उत्पन्न गटाची कोणतीही अट नसेल. केवळ सामाजिक आरक्षण या घरांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे या घरांसाठी कोणीही अगदी ज्यांचे मुंबईत एकापेक्षा अधिक घरे असतील, म्हाडाचे, एसआरएचे घर असेल तरीही ते म्हाडाचे घर घेऊ शकणार आहेत. एकाच वेळी या योजनेतील एकापेक्षा अधिक घरेही इच्छुकांना, अर्जदारांना खरेदी करता येणार आहेत. तसेच या घरांसाठी केवळ आधारकार्ड आणि पॅनकार्ड लागणार असून अर्जदार भारताचा नागरिक असावा तसेच त्याचे वय १८ वर्षे पूर्ण असावे इतकीच अट असणार आहे. सामाजिक आरक्षणातील घरासाठी मात्र जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असेल.

अनामत रक्कम भरमसाठ?

मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांसाठी उत्पन्न गटाप्रमाणे अनामत रक्कम आकारली जाते. १५ हजार ते दीड लाखांपर्यंत अनामत रक्कम आकारली जाते. प्रथम प्राधान्य योजनेसाठी मात्र भरमसाठ अनामत रक्कम आकारण्यात आल्याची चर्चा आहे. ही रक्कम एक लाख ते चार लाखांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाच वर्षाची अटही या घरांसाठी नाही

सोडतीतील विजेत्यांना घराचा ताबा मिळाल्यापासून पाच वर्षे घर विकता येत नाहीत. घर विकणार्याविरोधात कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. पण प्रथम प्राधान्य योजनेसाठी मात्र ही अट लागू नाही. या योजनेतील घर घेतल्यानंतर ते कधीही विकता येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.