मुंबई : मुंबईत सोडतीशिवाय म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी इच्छुकांना आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेच्या संगणकीय प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने मंडळाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया अचानक पुढे ढकलली होती. ही प्रक्रिया पुढे ढकलून एक आठवडा झाला असून अजूनही ही प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया सुरू करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.
मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. परवडणारी घरे विकली जात आहेत. मात्र कोट्यवधींची घरे काही केल्या विकली जात नसल्याने महागडी घरे मोठ्या संख्येने रिक्त रहात आहेत. दोन वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही घरे विकली जात नसल्याने रिक्त घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य योजने’अंतर्गत करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला. दिवाळीनंतर ही योजना सुरू होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणांमुळे या योजनेस विलंब झाला. पण ही योजना मार्गी लावण्याचा निर्णय घेत ३ फेब्रुवारीला १२० घरांची ‘प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विक्री करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली.
या जाहिरातीनुसार गुरुवारी ५ फेब्रुवारीपासून नोंदणीस सुरुवात होणार होती. तर १२ फेब्रुवारीपासून अर्जविक्री-स्वीकृती आणि अनामत रक्कम भरून सदनिका निश्चित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार होती. म्हाडाच्या सोडतीतील घरांची अनेक अटीसापेक्ष विक्री करण्यात येते. यापैकी मुख्य अट म्हणजे म्हाडाचे वा कोणत्याही सरकारी योजनेतील घर नसलेल्या, मालकी हक्काचे घर नसलेल्यांनाच सोडतीत सहभागी होता येते. तर कौटुंबिक उत्पन्न मर्यादाही लागू होते.
एकावेळी म्हाडाचे एकच घर घेता येते आणि त्यानंतर पुढे कधीही सोडतीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे या अटींमध्ये न बसणाऱ्यांना म्हाडाचे घर घेता येत नाही. अशा वेळी ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घर घेण्यासाठी कोणत्याही विशेष अटी नाहीत. केवळ अर्जदाराचे वय १८ वर्षे असावे आणि तो भारताचा नागरिक असावा इतकीच अट आहे. या योजनेअंतर्गत एका वेळी एकापेक्षा अधिक घरे घेता येतात. त्यामुळे या योजनेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण नोंदणीच्या एक दिवस आधीच मंडळाने नोंदणीसह सर्व प्रक्रिया पुढे ढकलली आणि इच्छुकांची प्रतीक्षा लांबली.
म्हाडाच्या सोडतीची संगणकीय प्रणाली असो वा इतर कोणतीही संगणकीय प्रणाली, ती अत्यंत कार्यक्षम असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात येतो. मात्र मागील काही दिवसांपासून म्हाडाच्या संगणकीय प्रणालीत सातत्याने अडचणी येताना दिसत आहेत. संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळेच पुणे मंडळाची ४१८६ घरांची सोडत लांबणीवर गेली होती. तर आता याचा फटका मुंबई मंडळाच्या ‘प्रथम प्राधान्य’ योजनेला बसला आहे.
तांत्रिक अडचणींमुळे ऐनवेळी योजनेची प्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मंडळावर ओढवली आहे. तर प्रक्रिया पुढे ढकलून आठवडा होत आला तरी अद्याप तांत्रिक अडचणी दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे म्हाडाच्या संगणकीय प्रणालीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, १२० घरांच्या ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील नोंदणीला केव्हा सुरुवात होणार याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना विचारले असता त्यांनी पुढील आठवड्यात नोंदणी सुरू होईल अशी माहिती दिली. त्यामुळे पुढील आठवड्यात नोंदणी सुरू होऊन त्यानंतर आठवड्याभराने प्रत्यक्ष घर खरेदीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
