मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून सोडतीशिवाय मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी बुधवारपासून इच्छुकांना उपलब्ध होणार आहे. बुधवारी सकाळी ११ पासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज भरल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. अन्यथा घरावरील दावा संपुष्टात येणार असून अदा केलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे. ही रक्कम १ ते ६ लाखांपर्यंत असल्याने अर्जदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे इच्छुकांनी विचारपूर्वक आणि १० टक्के रकमेची तरतूद असेल तरच अनामत रक्कमेसह अर्ज भरणे आवश्यक आहे.

मुंबईतील महागडी घरे विकली जात नसल्याने मध्यम व उच्च गटातील घरे मोठ्या संख्येने रिक्त राहिली आहेत. तर अल्प गटातील काही घरे योग्य ठिकाणी नसल्याने रिक्त आहेत. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही ही घरे विकली गेलेली नाहीत. परिणामी, मुंबई मंडळाचा महसूल अडकून राहिला आहे. त्यामुळे मंडळाने प्रथमच मुंबईतील ११८ घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुकांच्या नोंदणीस सुरुवात करण्यात आली. नोंदणी पुढेही सुरू राहणार असून, आता बुधवारी सकाळी ११ पासून अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याच्या, म्हणजेच घर खरेदी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. नोंदणीधारकांना आपल्या पसंतीचे घर निवडावे लागेल आणि त्यानंतर अनामत रक्कम भरावी लागेल. ५० लाखांपर्यंतच्या घरांसाठी एक लाख रुपये, ५० लाख ते एक कोटीपर्यंतच्या घरांसाठी दोन लाख रुपये, एक ते दोन कोटीपर्यंतच्या घरांसाठी चार लाख रुपये आणि दोन कोटींपुढील घरांसाठी सहा लाख रुपये अशी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

जे अर्जदार बुधवारपासून अनामत रक्कम भरतील, त्यांना अर्ज सादर केल्यापासून पुढील ४८ तासांत घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रक्कम अदा करावी लागणार आहे. अन्यथा घरावरील दावा संपुष्टात येईल आणि अनामत रक्कम जप्त केली जाईल, असा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यामुळे एक ते सहा लाख रुपये गमवावे लागू शकतात. अर्जदारांनी विचारपूर्वक अर्ज सादर करावा आणि १० टक्के रकमेची तजवीज असेल तरच अनामत रक्कम भरावी, असे आवाहन मुंबई मंडळाने केले आहे. दरम्यान, मुंबईत प्रथमच ही योजना राबवली जात आहे. सोडतीशिवाय म्हाडाचे घर घेता येणार आहे. मुंबईत किंवा इतरत्र कुठेही घर असले तरी या योजनेत घर घेता येणार आहे. मात्र, या विक्रीतील बहुतांश घरे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची असल्याने या योजनेला कसा प्रतिसाद मिळतो आणि ११८ घरे विकली जातात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.