मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने वर्सोव्यातील आराम नगर अभिन्यासात आता १० मजली वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अंदाजे ६३ कोटी रुपये खर्चाच्या या वृद्धाश्रमाच्या इमारतीच्या बांधकामासाठी नुकतीच मुंबई मंडळाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा प्रक्रिया अंतिम करून शक्य तितक्या लवकर कामास सुरुवात करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.
राज्याच्या गृहनिर्माण धोरणात वृद्धांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या निवाऱ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गृहप्रकल्प निर्मितीला चालना देण्यासाठी अनेक तरतुदीही करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, केंद्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास ‘ग्रोथ हब’ म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रोथ हबची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) आहे. या ग्रोथ हबअंतर्गत आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट म्हाडाला देण्यात आले आहे.
यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या निवाऱ्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने एमएमआरमध्ये वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाण्यात माजीवाडा येथे २१ मजली वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृहाच्या स्वतंत्र इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रक्रिया सुरू असताना आता मुंबईतही म्हाडाचे पहिले वृद्धाश्रम उभे राहणार आहे. मुंबई मंडळाने वांद्रे विभागाच्या माध्यमातून वर्सोवा येथील आराम नगर अभिन्यासात वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आराम नगरमधील २३०६ चौरस मीटर जागेवर अडीच चटई क्षेत्र निर्देशांकानुसार वृद्धाश्रम बांधण्यात येणार आहे. १० मजली वृद्धाश्रमाच्या इमारतीचा आराखडा वास्तूरचनाकार शशी प्रभू यांनी तयार केला आहे. या आराखड्यात काही बदल सुचविण्यात आले असून त्यानुसार सुधारित आराखडा तयार केला जात आहे. या वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबई मंडळाने निविदा प्रसिद्ध केली आहे. ही निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली जाणार आहे.
बांधकाम सुरू झाल्यापासून ३६ महिन्यांच्या कालावधीत ते पूर्ण करून वृद्धाश्रम कार्यान्वित केला जाणार आहे. या वृद्धाश्रमात कार्यालय, डे-केअर, सभागृह, उपाहारगृह, बँक, दवाखाना, मनोरंजन केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत पहिले वृद्धाश्रम उभारण्यात येणार असून ते कार्यान्वित झाल्यास गरजू ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांना मोठा दिलासा मिळणार आहे.

